जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालकांच्या २० जागांसाठी होणार्‍या निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीत सात मतदारसंघांमध्ये दहा इच्छुकांनी प्रतिस्पर्धी १७ जणांच्या उमेदवारी अर्जांवर हरकती घेतल्या. यात भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या अर्जांवर आक्षेप नोंदविले. सोमवारी (१४ नोव्हेंबर) निवडणूक निर्णय अधिकार्‍यांमार्फत वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. २८ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दूध संघाच्या निवडणुकीत १७९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ११ नोव्हेंबर रोजी अर्जांची छाननी करण्यात आली. त्यात आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे, संजय पवार, वाल्मीक पाटील यांच्यासह सतरा जणांच्या उमेदवारी अर्जांवर हरकती घेण्यात आल्या. या हरकतींवर सायंकाळी निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवाई यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावर १४ नोव्हेंबरला निर्णय दिला जाणार आहे. दरम्यान, आमदार चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम असल्याचा दावा केला असून, त्यांनी सर्वपक्षीय पॅनलनिर्मितीची जबाबदारी घेतली आहे. निवडणुकीत भाजपने सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : नांदुर शिंगोटे दरोडा प्रकरणात सात संशयितांना अटक; टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई होणार

या इच्छुकांच्या अर्जांवर घेतली हरकत

मुक्ताईनगर तालुका मतदारसंघातील उमेदवार मंदाकिनी खडसे यांनी त्या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरणारे आमदार मंगेश चव्हाण यांच्या अर्जावर हरकत घेतली. त्यांच्यासह उमेदवार रमेश पाटील आणि सुभाष पाटील यांच्याविरोधातही त्यांनी लेखी हरकत नोंदविली. जळगाव तालुका मतदारसंघातील उमेदवार खेमचंद महाजन यांनी मुक्ताईनगर मतदारसंघात आमदार चव्हाणांविरोधात हरकत नोंदविली. धरणगाव तालुका मतदारसंघात जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांनी त्या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरणारे वाल्मीक पाटील आणि ओंकार मुंदडा यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली, तर ओंकार मुंदडा यांनीही संजय पवार यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत नोंदविली. रावेर तालुका मतदारसंघात जगदीश बढे यांनी गीता चौधरी, मिलिंद वायकोळे आणि सुभाष सरोदे या प्रतिस्पर्ध्यांच्या अर्जांवर हरकत घेतली आहे. अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघात उदय अहिरे यांनी आमदार सावकारे, श्रावण ब्रह्मे यांच्या अर्जांवर हरकत घेतली. विमुक्त जाती-जमाती मतदारसंघात विजय रामदास पाटील यांनी अरविंद देशमुख यांच्या अर्जावर हरकत घेतली. भडगावमध्ये डॉ. संजीव पाटील यांनी संदीपकुमार पाटील यांच्याविरोधात हरकत घेतली. चोपडा तालुका मतदारसंघात रोहित निकम यांनी इंदिराबाई पाटील आणि रवींद्र पाटील यांच्याविरोधात, तर रवींद्र पाटील यांनी रोहित निकम यांच्या अर्जावर हरकत नोंदवली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Objections to applications of 17 aspirants from seven constituencies of jalgaon district milk union tmb 01