नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या शिक्षकेतर पदांच्या भरती प्रक्रियेत बनावट उमेदवार परीक्षेस बसणे, परीक्षेमध्ये गैरप्रकार करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर होणे, याबाबतच्या तक्रारी ठोस पुराव्यांअभावी सिद्ध होत नसल्याचे निरीक्षण या संदर्भात चौकशी करणाऱ्या समितीने नोंदविले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरोग्य विद्यापीठाच्या आस्थापनेवर शिक्षकेतर पदांसाठी परीक्षा घेण्यात आली आहे. या परीक्षेत बनावट उमेदवार बसवले गेले, इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर झाल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, विद्यापीठाने चौकशी समिती नेमली. या समितीकडून प्राप्त झालेल्या निरीक्षणांची माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी दिली.

हेही वाचा – मालेगावात प्राणघातक शस्त्रसाठा जप्त, अजमेर येथून वाहतूक, एकास अटक

विद्यापीठाच्या भरती प्रक्रियेत कुठल्याही परीक्षार्थी उमेदवाराने परीक्षा काळात बनावट उमेदवार परीक्षेस बसणे किंवा परीक्षेत गैरप्रकाराकरीता कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरल्याबाबतची तक्रार केल्याचे आढळून आले नाही. विद्यापीठाला आरोग्य विज्ञानाच्या विविध अभ्यासक्रमांची परीक्षा घेण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. परीक्षा केंद्रांवर केंद्रप्रमुख, केंद्र निरीक्षक, अंतर्गत दक्षता पथक व भरारी पथक अशी यंत्रणा नेमण्यात आली होती. त्यामुळे तक्रारीत नमुद घटना घडणार नाही याची विद्यापीठाने योग्य ती खबरदारी घेतली होती. बनावट उमेदवार परीक्षेस बसणे, परीक्षेमध्ये गैरप्रकार करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर होणे याबाबतच्या तक्रारी या टप्प्यावर ठोस पुराव्यांअभावी सिद्ध होत नसल्याचे समितीने म्हटले आहे.

हेही वाचा – महापालिका आयुक्तपदाचा तिढा सुटता सुटेना; मॅटमध्ये आता उद्या सुनावणी

निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश त्यांच्याविरुद्ध कुठल्याही पोलीस ठाण्यात फौजदारी स्वरुपाचा व विशेषतः कुठल्याही परीक्षेत गैरकृत्य केल्याबाबतचा गुन्हा नोंद नसल्याचे किंवा प्रलंबित नसल्याचे हमीपत्र देण्याच्या अधीन राहून द्यावा. या हमीपत्रातील माहिती खोटी असल्याचे आढळून आल्यास संबंधित उमेदवाराची नियुक्ती रद्द करून सेवा खंडित करण्याचा विद्यापीठास अधिकार असेल याबाबतची अट नियुक्ती पत्रात नमुद करावी. तसेच, नियुक्ती आदेशानुसार संबंधित पदावर रुजू होताना पोलीस यंत्रणेमार्फत दिला जाणारा चारित्र पडताळणीचा दाखला घेण्यात यावा, असेही चौकशी समितीने म्हटले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Observation of inquiry committee regarding maharashtra university of health sciences recruitment process ssb