नाशिक: पंचवटीतील औरंगाबाद रस्त्यावरील कैलासनगर (मिरची हॉटेल) चौकात महानगरपालिकेने गुरूवारी धडक मोहीम राबवत वाहतुकीला अडथळा ठरणारी १० दुकाने आणि हॉटेलचे अतिक्रमण जमीनदोस्त केले. चौकातील सिग्नलवर येईपर्यंत आसपासच्या रस्त्यांवरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नव्हता. काही अतिक्रमणधारकांनी आधीच स्वत:हून आपले अतिक्रमण काढून घेतले होते. ज्यांनी नोटीसीला प्रतिसाद दिला नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
पंचवटीतील या चौकात खासगी प्रवासी बस-डंपरच्या अपघातात होरपळून १२ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर यंत्रणांना जाग आली. अपघातप्रवण क्षेत्रात आधीच उपाय झाले असते तर प्रवाशांना प्राण गमवावा लागला नसता, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांमधून उमटली होती. या भागातील अपघाताचे धोके कमी करण्यासाठी तातडीने पाऊले उचलली गेली. चौकास अतिक्रमणांनी वेढलेले होते. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना प्रत्यक्ष चौकात येईपर्यंत आसपासच्या रस्त्यांवरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नव्हता.
हेही वाचा >>> नाशिक: शहरात चोरट्यांची दिवाळी; चार घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास
महानगरपालिकेने अतिक्रमणधारकांना नोटीस बजावली होती. १२ ते १३ व्यावसायिकांनी स्वत:हून आपले अतिक्रमण काढले. काहींनी प्रतिसाद दिला नव्हता. गुरूवारी सकाळी मनपाचे पथक पोलीस बंदोबस्तात दाखल झाले. वाहतुकीस अडथळा ठरणारे १० गाळे, मिरची हॉटेलचा वाहतुकीस अडथळा ठरणारा भाग, चौकातील इतर अतिक्रमणे हटविली गेली. अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी तीन जेसीबींचा वापर करण्यात आला. शहरातील प्रमुख चौकातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण काढण्याची कारवाई पुढील काळात अशीच सुरू राहणार आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांनी स्वत:हून आपली अतिक्रमणे काढावीत अन्यथा संबंधितांवर महानगरपालिका कारवाई करेल, असा इशारा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपायुक्त करुणा डहाळे यांनी दिला. अपघातानंतर कैलासनगर चौकात अनेक सुधारणा केल्या जात आहेत. गतिरोधक आणि रंबल पट्ट्यांची उभारणी करण्यात आली. अपघात प्रवण क्षेत्र, गतिरोधकाचे फलक लावण्यात आले. रस्त्यांचे रुंदीकरणही केले जाणार आहे. नांदूर नाका आणि सिद्धिविनायक लॉन्स चौकातही सुधारणा केली जाणार असल्याचे मनपाने म्हटले आहे.