अनिकेत साठे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या नाशिकमधील संपर्क कार्यालयासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे उंटवाडी रस्त्यावरील सिंचन भवन परिसरातील संपर्क कार्यालय शासकीय यंत्रणेने रिकामे करवून घेतले आहे. या संदर्भात निरोप आल्यानंतर उपाध्यक्षांनी हा विषय प्रतिष्ठेचा न करता जागा सोडण्याची तयारी दर्शवली. झिरवाळ यांच्या कार्यालयात आता पालकमंत्री भुसे यांचे संपर्क कार्यालय होणार आहे. बांधकाम विभागाने लगबगीने इमारतीची रंगरंगोटी, नव्या फर्निचरची व्यवस्था करीत स्वागताची तयारी केली आहे.

राज्यात महाविकास आघाडी आणि शिवसेना (शिंदे गट)-भाजप युतीतील टोकाचे मतभेद वारंवार समोर येत आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सेनेचे मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे हे कृषिमंत्री होते, तर दिंडोरीतील राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ यांची विधानसभेचे उपाध्यक्षपदी आहेत. उभयतांनी अडीच वर्षे एकत्र काम केले. तेव्हापासून झिरवाळ यांचे हे संपर्क कार्यालय अस्तित्वात होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सत्ता समीकरणे बदलली, तसे स्थानिक राजकारणही बदलले. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप सरकारमध्ये दादा भुसे यांची खनिकर्म मंत्रिपदी वर्णी लागली. जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्यावर आली. नागरिकांना सहजपणे संपर्क साधता यावा म्हणून त्यांनाही शहरात कार्यालयाची निकड आहे. त्यासाठी जागेचा शोध उंटवाडी रस्त्यावरील झिरवाळ यांच्या कार्यालयावर येऊन थांबला.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात नाशिकचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांच्याकडे होते. त्यांचे शहरात निवासस्थान आणि संलग्न कार्यालय असल्याने त्यांना या कार्यालयाची गरज भासली नाही. विद्यमान पालकमंत्री मालेगावचे आहेत. वेगवेगळय़ा भागांतील नागरिकांना कामांसाठी मालेगावला ये-जा करणे जिकिरीचे ठरते. त्यामुळे त्यांचे नाशिक शहरात कार्यालय गरजेचे होते. त्यासाठी उपाध्यक्षांच्या अस्तित्वातील कार्यालयाची जागा निवडण्यात आली. हा विषय न्यायप्रविष्ट असला तरी त्यांचे कार्यालय रिक्त करण्यामागे राजकीय डावपेचांची चर्चा होत आहे.

विश्रामगृहाचे रूपांतर

विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळ यांचे कार्यालय नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या संपर्क कार्यालयात रूपांतरित होण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. त्यामुळे आजही प्रवेशद्वारावर उभयतांचे फलक झळकतात. कार्यालयाची इमारत कधीकाळी पाटबंधारे विभागाचे विश्रामगृह होते. तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकचे पालकत्व असताना विश्रामगृहाचे पहिल्यांदा संपर्क कार्यालयात रूपांतर झाले. तेव्हापासून सत्ताधारी ही जागा कार्यालयासाठी वापरू लागले आहेत.

पालकमंत्र्यांच्या कार्यालयासाठी उंटवाडी रस्त्यावरील जागा वापरली जाते. प्रशासनाकडून याबाबत निरोप आल्यानंतर आपण नाशिकच्या संपर्क कार्यालयाची जागा सोडण्याचा निर्णय घेतला. हे ठिकाण मतदारसंघातून येणाऱ्यांना सोयीचे नव्हते. त्यामुळे दिंडोरी रस्त्यावरील मेरीच्या जागेत आपले नवीन संपर्क कार्यालय कार्यान्वित केले जाणार आहे.

नरहरी झिरवाळ,  विधानसभा उपाध्यक्ष.