लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक: जालना येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारचा सर्व स्तरातून निषेध नोंदविला जात असतांना मराठा संघटनांसह राजकीय पक्षही आक्रमक झाले आहेत. शहर परिसरात ठिकठिकाणी पोलिसांच्या लाठीमाराचा निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले.

मराठा क्रांती मोर्चा आणि संभाजी बिग्रेडच्या वतीने मध्यवर्ती बस स्थानकाजवळ शिवाजी पुतळ्यासमोर आंदोलन केले. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी शिवाजी महाराज पुतळ्यानंतर मेहेर सिग्नल परिसरात मोर्चा वळविला. या ठिकाणी मोर्चेकऱ्यांनी टायर जाळण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा… Jalna Lathi Charge: जालन्यात लाठीमाराचा आदेश कोणी दिला; रोहित पवार यांचा प्रश्न

पोलिसांनी आंदोलनकर्त्यांकडून टायर जप्त केले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. या गोंधळामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली. शाळेची सुट्टी झाल्याने विद्यार्थी घरी येण्यासाठी निघाले असतांना आंदोलनांमुळे त्यांचा खोळंबा झाला. मराठा आमदारांनी आरक्षणाचा आग्रह धरावा, तसेच जालन्यातील घटनेमुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.

हेही वाचा… सर्व अंगणवाड्यांना आता इमारत; १७ हजार पदांची भरती; पोषण माह राज्यस्तरीय अभियानाचे उदघाटन

नाशिकरोड येथील शिवाजी महाराज पुतळा चौक येथे महाविकास आघाडीच्या वतीने सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. या वेळी शिवसेना उपनेते बबन घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू असतांना टरबूज फोडण्यात आले. यावेळी माजी आमदार योगेश घोलप, राष्ट्रवादीचे अशोक पाटील, काँग्रेसचे दिनेश निकाळे आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On behalf of maratha kranti morcha and sambhaji brigade a protest for the jalna incident was held in front of the shivaji statue in nashik dvr
Show comments