मनमाड : शिवजयंतीनिमित्त मनमाड – नांदगाव मार्गावरील पथदीपांना क्रेनवर उभे राहून झेंडे लावण्याची कसरत युवकांच्या जीवावर बेतली. मालमोटारीची धडक बसल्याने क्रेन रस्त्यावर उलटून दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले. क्रेनला धडक बसल्याने तिचा अतिदाबाच्या तारांना स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून ही दुर्घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनमाड- नांदगाव रस्त्यावर डमरे मंगल कार्यालयासमोर रविवारी रात्री हा अपघात झाला. शिवजयंतीनिमित्त मनमाड – नांदगाव मार्गावरील पथदीपांना भगवे झेंडे लावण्याचे काम करण्यात येत होते. पथदीप उंच असल्याने त्यासाठी क्रेनची मदत घेतली जात होती. क्रेनवर पाच जण झेंडे लावण्याचे काम करत होते. हे काम चालू असताना भरधाव आलेल्या मालमोटारीची क्रेनला धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की, क्रेन रस्त्यावरून गेलेल्या अतिदाबाच्या तारांवर आदळल्यामुळे विजेचा धक्का बसला. या अपघातात. चार्ल्स फ्रान्सिस आणि अजय पवार या दोघांचा जागीच मृत्यू झाला. ब्रोनो फ्रान्सिस, सचिन हाटकर, क्रेन चालक रणजीत कुमार आणि मालमोटार चालक प्रभाकर ताजणे असे चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून मालेगाव येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. या प्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस कर्मचारी करत आहेत.