मनमाड : मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकांत फलाट क्रमांक सहावर मुंबई-नांदेड तपोवन एक्सप्रेस छत्रपती संभाजी नगरकडे निघाली असतांनाच दोन प्रवासी महिला व त्यांचे चार वर्षाचे बाळ घेवून धावत्या गाडीमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी त्यांचा तोल जावू लागल्याने फलाटावर ड्युटीसाठी असलेल्या लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने क्षणाचाही विलंंब न लावता धावत पळत बोगी गाठली आणि खाली पडणार्‍या बाळाला व महिला प्रवाशांना अक्षरशः गाडी खालून ओढून बाहेर काढले व त्यांचे प्राण वाचविले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनमाड लोहमार्ग पोलीस कर्मचारी या प्रवाशांसाठी देवदूत ठरले. दैव बलवत्तर म्हणून हे सर्व प्रवासी सुखरूप असून त्यांना छत्रपती संभाजी नगर येथे पाठविण्यात आले. मनमाड लोहमार्ग पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दासरे व हवालदार वाघ यांनी हे काम फत्ते केले.

हे ही वाचा… राजाभाऊ दिल्लीत, माणिकराव मुंबईत, हे ठरवून घेतले का ? खासदार सत्कार सोहळ्यात जुगलबंदी

गुरूवारी सकाळी रेल्वे स्थानकांत फलाट क्रमांक सहावर ही घटना घडली. मुंबई-नांदेड तपोवन एक्सप्रेस फलाटावरून छत्रपती संभाजी नगरकडे निघाली असतांना एक चार वर्षाचे लहान बाळ घेऊन दोन प्रवासी महिला चालत्या गाडीमध्ये चढत होत्या. मात्र गाडी धावू लागल्याने त्यांचा जीव धोक्यात आला. ही परिस्थिती पाहून दासरे व वाघ यांनी क्षणार्धात धाव घेऊन जागरूकता व समयसुचकतेने बोगीच्या दरवाज्यातून गाडीखाली जात असलेल्या बाळाला व महिला प्रवाशांना गाडी खालून ओढून बाहेर काढले व त्यांचे प्राण वाचवले. शकील अहमद जमील अहमद, आफिया फिरदोस शकील अहमद, शकीला बानो मोहम्मद हसीम अशी या प्रवाशांची नावे आहेत. गाडी थांबल्यानंतर या प्रवाशांना सुखरूप मार्गस्थ करण्यात आले. पोलीस कर्मचारी दासरे व वाघ यांनी दाखविलेल्या समय सुचकतेबद्दल लोहमार्ग पोलीस अधिक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी मारूती पंडीत यांनी त्यांचे अभिनंदन केले.

हे ही वाचा… सायबर गुन्हेगारीत वाढ, सहा महिन्यात १५ कोटीहून अधिक रक्कम लंपास

महाराष्ट्र लोहमार्ग पोलीस हे नेहमीच सतर्क असतात. रेल्वेमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या सामानाची आणि त्यांच्या जीवाची काळजी घेतात. जखमी झालेल्या व्यक्तींना तात्काळ रूग्णालयात घेऊन जाण्याचे कर्तव्य बजावतात. वरील प्रकार हा त्याचीच प्रचिती आहे. – शरद जोगदंड, निरीक्षक, लोहमार्ग पोलीस ठाणे, मनमाड

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On manmad railway station life of two women and a baby were saved due to prompt action of the railway police grp asj