नाशिक : गोदावरी, दारणा, नंदिनी आणि वालदेवी नद्यांची प्रदूषणमुक्ती, सामाजिक दायित्व निधीतून साकारलेले प्रकल्प सामान्यांसाठी खुले करणे, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर कायमस्वरुपी उपाययोजना, आदी मागण्यांसाठी सोमवारी मनसेच्यावतीने महापालिकेसमोर घंटानाद करुन प्रशासनाचा निषेध करण्यात आला. सिंहस्थाची कामे स्थानिक भूमिपुत्रांना देण्याची मागणी मनसेने केली आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबाधणीला सुरुवात केली आहे. शहरवासीयांशी निगडीत प्रश्नांवर आंदोलनाचे सत्र सुरू आहे. या चढाओढीत मनसेही मागे नाही. नागरी समस्यांकडे वारंवार लक्ष वेधूनही दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. महानगरपालिकेच्या राजीव गांधी भवन या मुख्यालयासमोर घंटानाद करण्यात आला.

नद्या प्रदूषणमुक्त करणे, खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती, रस्ते, जलवाहिनी, गटार अशा मूलभूत सुविधांना तातडीने मंजुरी, मनपात नोकरभरती, कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन याकडे निवेदनातून लक्ष वेधण्यात आले. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शहरात कोट्यवधींची कामे करण्यात येणार आहेत. या कामात स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य देण्याचा आग्रह मनसेने धरला. ही कामे लवकर सुरू करण्याची गरज मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील यांनी मांडली. आंदोलनात पाटील यांच्याह प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, महिला सेना प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

धोकादायक झाडांची नियमानुसार छाटणीची गरज

रस्त्यांवरील धोकादायक झाडांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. अलीकडेच गंगापूर रस्त्यावर झाडाची फांदी कोसळून महिलेचा मृत्यू झाला होता. धोकादायक झाडांची झाडांची नियमानुसार छाटणी व वृक्षप्रेमींशी चर्चा करण्याकडे पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.