नाशिक : मराठी भाषा गौरव दिवसानिमित्त येथील सार्वजनिक वाचनालयाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी नाशिक ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्य शासनाचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, माध्यमिक शिक्षण विभाग, सार्वजनिक वाचनालय यांचे सहकार्य या ग्रंथोत्सवासाठी लाभले असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील जगताप यांनी दिली.
ग्रंथदिंडीने महोत्सवाची सुरुवात होईल. गुरुवारी सकाळी आठ वाजता प. सा. नाट्यगृहापासून दिंडी निघेल. ११ वाजता ग्रंथोत्सव, अक्षरबाग बाल साहित्य मेळाव्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते उदघाटन होईल. कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे हे अध्यक्षस्थानी असतील. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तसेच जिल्ह्यातील खासदारांसह आमदारही उपस्थित राहणार आहेत.
ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी दुपारी १.३० वाजता वाचनालयाच्या सभागृहात अक्षरबाग बालसाहित्य मेळावा तसेच दुपारी १.३० ते २.४५ या वेळेत औरंगाबादकर सभागृहात विद्यार्थी परिसंवाद, दुपारी तीन ते ४.१५ या वेळेत साहित्यिकांशी गप्पा, सायंकाळी सहा वाजता कल्पनेच्या तीराकडील कुसुमाग्रजांचे यथार्थ दर्शन घडविणारा संवाद सोहळा होईल. त्यात वि. वा. शिरवाडकर यांच्या ‘वाटेवरच्या सावल्या’ ची संहिता दत्ता पाटील यांची तर, दिग्दर्शक सचिन शिंदे असतील. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता आठवणीतील कुसुमाग्रज हा कार्यक्रम अपर्णा क्षेमकल्याणी, नीलेश गायधनी, पंकज क्षेमकल्याणी सादर करतील, कीर्ती भवाळकर यांचे नृत्य होईल. दुपारी १२ वाजता प्रा. डॉ. प्रमोदकुमार हिरे यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती’ विषयावर व्याख्यान, दुपारी २.३० वाजता मयूर देशमुख हे ‘ग्रंथ हेची संत’ याविषयावर भारुड आत्मप्रबोधनपर कार्यक्रम सादर करतील. दुपारी ४.३० वाजता ग्रंथोत्सवाचा समारोप होईल.