नाशिक – बम बम भोले…ओम नमो शिवाय, अशा जयघोषात श्रावणातील पहिल्या सोमवारी शहरासह जिल्ह्यातील सर्व शिवमंदिरे भक्तांनी गजबजली. पावसाने विश्रांती घेतल्याने भाविकांचा उत्साह अधिकच वाढला. सर्वच मंदिरांना रोषणाई, फुलांची सजावट करण्यात आली होती. त्र्यंबकेश्वरसह कपालेश्वर, सोमेश्वर, दोधेश्वर या मंदिरांमध्ये सायंकाळपर्यंत भाविकांची गर्दी कायम होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे श्रावणात भाविकांची त्र्यंबकेश्वर दर्शन तसेच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यंदाही पहिल्या श्रावणी सोमवारी भाविकांच्या गर्दीने त्र्यंबक गजबजले. दर्शनासाठी पहाटे चार पासूनच भाविकांनी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पूर्व दरवाजासमोर रांगा लावल्या होत्या. कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी जाणारे आणि ज्योतिर्लिंग दर्शनासाठी जाणारे भाविक बम बम भोलेचा जयघोष करीत होते. काहींनी कावडीने गोदावरीचे जल नेण्यासाठी मिरवणूक काढल्या होत्या.

हेही वाचा >>>मालेगावजवळ पोल्ट्रीत बिबट्या शिरला अन्…

भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी देवस्थानच्या वतीने आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात आल्या. मंदिराच्या उत्तर दरवाजात ग्रामस्थांची दर्शनासाठी गर्दी आणि बाहेर पडणारे भाविक, त्यातच दरवाजात मधोमध उभे सुरक्षारक्षक यामुळे उत्तर दरवाजातून आतमध्ये प्रवेश करणे ही भाविकांसह देवस्थानच्या कर्मचाऱ्यांची संयम पाहणारी बाब ठरली. सुमारे २० हजार भाविकांना दर्शनाचा लाभ मिळाला असला तरी व्यवस्थेतील त्रुटी कायमच असल्याचे पहिल्याच श्रावणी सोमवारी दिसून आले.

हेही वाचा >>>VIDEO : गिरणा नदीत अडकलेल्या मालेगावातील १५ जणांची लष्करी हेलिकॉप्टरद्वारे सुटका

दरम्यान, देवस्थानच्या वतीने नेहमी होणाऱ्या हाणामाऱ्या, भाविकांशी केले जाणारे गैरवर्तन, यासंदर्भात दिलगिरी व्यक्त करुन आगामी काळात गर्दीच्या ठिकाणी देणगी पास देण्यासाठी तसेच ऑनलाईन दर्शनासाठी व्यवस्था आणि उज्जैनच्या धर्तीवर पर्यायी दर्शन व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सुचित करण्यात आले. सायंकाळी त्र्यंबकराजाची मिरवणूक शहरातून काढण्यात आली. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गावर भाविकांची गर्दी नेहमीपेक्षा कमी राहिली. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले होते.

नाशिक येथेही गोदाकाठावरील कपालेश्वर मंदिर परिसरात पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली होती. मंदिराकडे येणारे रस्ते हे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. यामुळे वाहनचालकांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागले. मंदिर परिसरात पूजेच्या सामानाच्या लहान विक्रेत्यांनी अतिक्रमण केले. दुकानांमुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शन रांगा कायम असताना दुसरीकडे लघुरूद्र, अभिषेक सुरू होते. रात्री उशीरापर्यंत भाविकांची गर्दी कायम राहिली. याशिवाय सोमेश्वर मंदिर, निलकंठेश्वर मंदिर यासह जिल्ह्यातील शिव मंदिरांमध्ये गर्दी कायम होती.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On the first monday of shravan all the shiva temples in nashik district including the city were filled with devotees amy