नाशिक, मनमाड – आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या वारकऱ्यांना पंढरपूर येथे पोहचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागानेही नियोजन केले आहे. विभागातून २५ जून ते चार जुलै या कालावधीत पंढरपूरसाठी २९० जादा बससेवा सोडण्यात येणार आहे.
आषाढी एकादशीला पंढरपूरला मोठी यात्रा भरते. २९ जून रोजी आषाढी एकादशी आहे. तसेच तीन जुलै रोजी गुरूपौर्णिमा आहे. या काळात पंढरपूरकडे असणारी यात्रेकरूंची ओढ लक्षात घेता नाशिक विभागाच्या वतीने जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. नाशिक (एक) आणि नाशिक (दोन) आगार, महामार्ग बसस्थानक, मालेगावातील नवीन बस स्थानक, सटाणा, नामपूर, देवळा, ताहाराबाद, मनमाड, चांदवड, सिन्नर, वावी, लासलगांव, विंचूर, निफाड, चांदोरी, नांदगाव, इगतपुरी, घोटी, येवला, कळवण, वणी, पिंपळगाव बसवंत, ओझर येथून जादा बस सोडण्यात येणार आहेत.
महामंडळाच्या मनमाड आगाराकडून मनमाड-पंढरपूर ही विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे. मनमाड येथून सकाळी साडेसात आणि दुपारी साडेतीन वाजता ही बस सुटणार आहे. आषाढी एकादशी निमित्ताने शहर आणि ग्रामीण भागांतील भाविकांना पंढरपूर येथे जाण्यासाठी २१ जूनपासून जादा बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत. भाविकांचे दर्शन सुखकर व्हावे, यासाठी मनमाड आगारातर्फे विशेष नियोजन करण्यात आले आहे. ज्या गावातून थेट पंढरपूरसाठी ४० किंवा अधिक प्रवासी असतील, त्यांच्यासाठी थेट गावातून बस उपलब्ध करून देण्यात येत आहे. या बससेवेला राज्य परिवहन महामंडळाच्या महिला सन्मान योजनेंतर्गत दिल्या जाणार्या ५० टक्के सवलतीचा तसेच ६५ ते ७५ वर्षाच्या ज्येष्ठ नागरीकांना ५० टक्के सवलतीचा व अमृत ज्येष्ठ नागरीक योजनेंतर्गत मोफत प्रवास सुविधेचा प्रवाशांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मनमाड बस आगारप्रमुख अभिजित चौधरी यांनी केले आहे.
हेही वाचा >>>सर्वहारा केंद्रातील प्रकाराची चौकशी करणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन
२५ जूनला एक, २६ तारखेला चार, २७ जूनला दोन, २८ तारखेला सहा, २९ जूनला पाच, ३० जून आणि एक जुलैला प्रत्येकी एक, तर दोन जुलै रोजी एक बस असे पंढरपूर बससेवेचे नियोजन मनमाड आगारातून करण्यात आले आहे. प्रवाशांकडून सुरक्षित प्रवास म्हणून नेहमीच एसटीला प्राधान्य दिले जाते. पंढरपूरची आषाढी यात्रा हा महाराष्ट्रांतील जनतेचा जिव्हाळ्याचा विषय असतो. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणार्या भाविकांची संख्या जास्त असते. त्यासाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.