लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव: एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिल्या जाणार्या सोने-चांदी खरेदीला साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या मुहूर्तावर सुवर्णनगरीला झळाळी प्राप्त झाली. ऐन सणासुदीच्या दिवसांत सोने-चांदीचे भाव वधारले असतानाही दागिने खरेदीसाठी लोकांनी पसंती दर्शविल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सुवर्ण बाजारात चैतन्य संचारल्याचे चित्र होते. मंगळवारी सोन्याचा प्रतितोळा दर ६१ हजार २०० रुपये, तर चांदीचा प्रतिकिलो दर ७३ हजार ५०० रुपये होता.
दसर्याच्या मुहूर्तावर ग्राहकांकडून सोने खरेदीला विशेष पसंती दिली जाते. त्यामुळे सराफा पेढ्यांसह शोरूममध्ये सोने खरेदीला उत्साह आला आहे. ग्राहकांच्या खरेदीने खर्या अर्थाने सोने खरेदीला झळाळी प्राप्त झाली आहे. ग्राहकांकडून सराफी पेढ्यांत खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याने व्यावसायिकांकडून ग्राहकांच्या मागणीनुसार दागिने घडविले जात आहेत. नवनवीन डिझाइनचे दागिने बाजारात आले असून, प्रामुख्याने मंगळसूत्र, बांगड्या, चिंचपेटी यांसह हलक्या वजनाच्या दागिन्यांची ग्राहकांमध्ये आवड दिसून येत आहे. अनकट डायमंडसह प्लॅटिनमच्या दागिन्यांचीही मागणी वाढल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी सोन्याच्या दागिन्यांची आगाऊ नोंदणी केली जात आहे. महिला व तरुणींकडून खासकरून पेशवाई आणि तयार दागिन्यांना विशेष पसंती दिली जात आहे. सोन्याची शिक्के, वेढे, सोन्या, चांदीत घडविलेल्या आपट्यांच्या पानांना विशेष मागणी होती. शहरातील विशिष्ट सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या दुकानांमध्ये आकर्षक सवलत दिली जात आहे.
आणखी वाचा-चांदवडच्या मंदिरात कोजागिरीला दीपोत्सव; जागर जोगवात ३१ भजनी मंडळांचा सहभाग
दिवाळीनंतर सोन्याच्या दरात काहीशी वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे लग्नसराईसाठी दसर्याचा मुहूर्त धरत आतापासून सोने खरेदी केली जात असल्याचे पाहायला मिळाले. १३ ऑक्टोबरला २४ कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा ५९ हजारांवर, तर चांदीचा दर प्रतिकिलो ७० हजारांवर होता. २३ ऑक्टोबरला ६२ हजारांपर्यंत, तर चांदीचा भाव प्रतिकिलो ७६ हजारांवर होता. २४ ऑक्टोबरला सोन्याचा प्रतितोळा दर ६१ हजार २०० रुपये अधिक जीएसटी आणि चांदीचा प्रतिकिलो ७३ हजार ५०० रुपयांपर्यंत होता. सोमवारपेक्षा २०० ते ३०० रुपयांनी सोने, तर अडीच हजारांनी चांदी दर कमी झाले. त्यामुळे ग्राहकांमध्ये दिलासा मिळाल्याचे दिसून आले.
इस्त्राईल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झाल्याने त्याचे पडसाद सोने-चांदीवर दिसून आले. फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये सोन्या-चांदीचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले होते. त्यावेळी सोन्याचा प्रतितोळ्याचा दर विनाजीएसटी ६३ हजारांपर्यंत, तर चांदीचा दर प्रतिकिलो ७७ हजारापर्यंत गेला होता. मात्र मध्यंतरी सोने-चांदीला उंच भरारी घेता आली नाही. जूनमध्ये घसरण झाल्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये पुन्हा वाढ दिसून आली होती. मात्र, ऑक्टोबरमध्ये पितृपक्षमुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली. १५ दिवसांपूर्वी दर कमी होतील, असा अंदाज असताना इस्त्राईल-हमास युद्धाने ग्राहकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले. गेल्या चार महिन्यांनंतर सोने-चांदीने विक्रमी वाढ नोंदविली आहे.
आणखी वाचा-बदनामीप्रकरणी दादा भुसे यांची सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध नोटीस
आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणार्या अनेक घटना- घडामोडींचा परिणाम सोने-चांदीच्या दरावर होत असून, मंगळवारी डॉलरचे दर कमी झाल्यामुळे सोने-चांदीचे दर कमी झाले. २०० ते २५० रुपयांनी सोने, तर चांदीचे दरही अडीच हजारापर्यंत खाली आले आहेत. -अजय ललवाणी (अध्यक्ष, जिल्हा सराफ असोसिएशन जळगाव)