नाशिक : धुळे शहरातील देवपूर या शैक्षणिक व उच्चभ्रु समजल्या जाणार्‍या परिसरातील वेगवेगळ्या कॅफेंवर गुरुवारी पोलिसांनी छापे टाकून आक्षेपार्ह साहित्य जप्त केले. अल्पवयीन मुलामुलींना ताब्यात घेण्यात आले असून संबंधित कॅफे मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे. धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महानगर पालिका आयुक्त अमिता दगडे- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्तपणे कारवाई सुरु करण्यात आली. कॅफेंच्या तपासणीत पलंग, खुर्च्या आणि अन्य आक्षेपार्ह साहित्यासह महाविद्यालयीन आणि शालेय मुले, मुलीही आढळल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरातील विविध भागात कॅफेच्या नावाखाली बेकायदेशीर कृत्य घडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आमदार अग्रवाल यांनीही तक्रार केली होती. स्वतः पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी संशयास्पद आणि विनापरवानगी थाटण्यात आलेल्या कॅफेंची तपासणी करण्याचे ठरवले. प्राथमिक चौकशी आणि पाहणीत दोषी आढळलेल्या कॅफे चालक व मालकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा धिवरे यांनी दिला आहे. या छाप्यांवेळी आमदार अग्रवाल, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, महापालिकेच्या आयुक्त अमिता दगडे पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार, महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रसाद जाधव हे सर्व घटनास्थळी उपस्थित होते.

अशा बेकायदेशीर ठिकाणी छापे घालणे गरजेचे आहे. काही ठिकाणी कंडोम सापडले. कॅफेत बेकायदेशीरपणे खोली काढून पलंग व्यवस्था केलेली आढळली. हा सर्व प्रकार धक्कादायक असल्याने कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया आमदार अग्रवाल यांनी व्यक्त केली. दरम्यान, शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) जिल्हाप्रमुख यांनीही या कारवाईचे स्वागत करुन शहरातील विविध अवैध धंद्यांवरही कारवाई करण्याची मागणी केली. आठवड्यापूर्वी पोलिसांनी देवपूरमधील काही कॅफेंवर छापे घातले होते. यानंतर पुन्हा त्यापैकीच काही कॅफेंवर आज बेकायदेशीर कृत्य घडत असल्याचे उघड होत असेल तर हे पोलिसांचे अपयश असल्याची टीकाह सोनवणे यांनी केली. माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी, कारवाईचे स्वागत करुन शहरातील हत्या,गुटखा, सट्टा, बनावट दारु यासह सोनसाखळी खेचणे, अमली पदार्थ तस्करी, बेकायदेशीर वाळू वाहतुक यावरही अंकुश ठेवायला हवा, असे सांगितले.

पोलीस आणि महापालिकेच्या वतीने गुरुवारी संपूर्ण शहरात मोहीम आखण्यात आली. काही ठिकाणी आढळलेल्या मुला-मुलींच्या पालकांना बोलावून त्यांना समज देण्यात येईल. बेकायदेशीर धंद्यांना बळ देणाऱ्या मालकांवर गुन्हे दाखल करणार आहोत. नागरिकांनी असे काही अवैध व्यवसाय चालू असतील तर आपल्याशी थेट संपर्क साधावा. श्रीकांत धिवरे (जिल्हा पोलीस अधीक्षक, धुळे)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On thursday police raided cafes in dhules devpur area and seized objectionable material sud 02