जळगाव : मकरसंक्रांतीचा सण जवळ आल्याने पतंग आणि मांजाला मोठी मागणी असून नायलॉन मांजा हा घातक असल्याचे सांगूनही सर्रास वापर होत असल्याचे उघड होत आहे. नायलॉन मांजाला बंदी असतानाही जोशीपेठ भागात महापालिकेच्या पथकाला तपासणीत बंद कुलरमध्ये मांजा आढळून आला. तो पथकाने जप्त करीत पाच हजाराचा दंड ठाेठावला. महापालिका, वनविभाग, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी एकत्रित कृती दल स्थापन करीत नायलॉन मांजाविरोधात धडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
न्यायालयाच्या आदेशाने नायलॉन मांजा विक्री करणे आणि बाळगण्यावर बंदी आहे. तरीही नायलॉन मांजाची विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. महापालिकेच्या पथकाने जोशीपेठ भागात तपासणी केली असता, एका दुकानात बंद कुलरमध्ये नायलॉन मांजा लपवून विक्री होत असल्याचे आढळून आले. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाच्या जप्तीसाठी महापालिकेच्या पथकाकडून तपासणी केली जात आहे. विभागीय स्वच्छता निरीक्षक जितेंद्र किरंगे यांच्या पथकाने जोशीपेठ परिसरातील ११ दुकानांची अचानक तपासणी केली. यावेळी वृत्तिक खिची यांच्या दुकानात बंदी असलेला नायलॉन मांजा आढळून आला. महापालिकेने खिची यांना पाच हजार रुपये दंड केला.
सध्या शहरातील विविध भागांत लपूनछपून नायलॉन मांजाची विक्री केला जात आहे. २०० ते ५०० रुपयांपर्यंत मांजा उपलब्ध आहे. मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांतून रेल्वेव्दारे नायलॉन मांजाचा साठा जिल्ह्यात येत असल्याचे सांगण्यात आले. महापालिका, वनविभाग, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी एकत्रित कृती दल स्थापन करावे. या कृती दलातर्फे कारवाई करून नायलॉन मांजा उत्पादक, साठवणूक, विक्रेते, वापर करणारे व मांजा बाळगणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निसर्गमित्र संस्थेतर्फे करण्यात आली आहे.
संस्थेचे अध्यक्ष पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ यांनी जिल्ह्यात राजरोस नायलॉन मांजा विकला जात असून, या घातक मांजामुळे पक्षी, पशू व मनुष्य नुसतेच जखमी होत नसून मृत्यमुखी पडत असल्याचे सांगितले. डोळे वा अन्य अवयव निकामी होऊन अपंगत्व येत आहे. नायलॉन मांजा रोहित्र, खांबावर पडून तारांमध्ये घर्षण होत आग लागण्याची शक्यता असते. यामुळे जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांनी नायलॉन मांजाविरोधात धडक कारवाईची मोहीम राबवावी. प्रत्येकाने पतंग उडविण्याचा आनंद नक्की लुटावा, पण नायलॉन मांजा न वापरता हाताने सहज तुटणारा व पर्यावरणपूरक सूती धागा वापरावा, असे आवाहनही गाडगीळ यांनी केले आहे. विक्रेत्यांकडे नायलाॅन मांजा आढळून आल्यास कारवाई केली जाईल, असे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले.