जळगाव : जिल्ह्यातील धरणगाव-चोपडा रस्त्यावरील पिंपळे फाट्याजवळ शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास जळगावहून शिरपूर जाणाऱ्या बसने ट्रॅक्टरला धडक दिली. या अपघातात एकजण ठार झाला असून, चालकासह २१ प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर धरणगावच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कामराज शरद सोनवणे असे मृत प्रवाशाचे नाव आहे.

हेही वाचा >>>नववर्षात नाशिकमध्ये शासकीय अधिकाऱ्यांना गणवेश; महिन्यातून एकदा सार्वजनिक वाहतूक वापराचे बंधन

धरणगाव तालुक्यातील दोनगावजवळ शुक्रवारी चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव बस खड्ड्यात गेल्याने २८ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शनिवारी सकाळी जळगाव ते शिरपूर बस धरणगाव येथून चोपडा जात असताना पिंपळे फाट्याजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरला धडकली. अपघातात बसमधून प्रवास करणारे पाळधी येथील शिक्षक कामराज सोनवणे यांचा मृत्यू झाला, ते चोपडा शहरातील प्रताप प्राथमिक विद्यालयात शिक्षक होते. अपघातात बसचा पुढील भाग पूर्णतः चक्काचूर झाला आहे.

अपघाताची माहिती समजताच धरणगावचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना तातडीने ग्रामीण रूग्णालयात दाखल करत विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. अपघाताची माहिती मिळताच मृत व जखमी प्रवाशांच्या नातेवाईकांनी ग्रामीण रूग्णालयात गर्दी केल्याचे दिसून आले. अपघातातील जखमींमध्ये जाकीर खाटीक (३५, रा.पिंप्री), शब्बीर खाटीक (६५, रा.पिंप्री), गंगाराम बाविस्कर (६८,रा.पिंप्राळा), प्रमिला सोनवणे (५०,रा,जळगाव), अनिस शेख (३८,रा.चोपडा), सागर पाटील (२८,रा.रोटवद), भगवान पाटील (७५,रा.पिंपळे सीम), जयश्री मराठे (४५,रा.नळ्यात), शरद पारधी (४०, रा.नंदुरबार), विमल मराठे (६५, रा.नळ्यात), रमेश मराठे (७५, रा.नळ्यात), कललबाई मराठे (७५, रा.वरूड), प्रवीण कुंभार (२४, रा.गोरगाव), ज्योती पाटील (३८, रा.साळवा), सुषमा बयस (३६, रा.धरणगाव), मेघना बयस (सात, रा.धरणगाव), योगेश पाटील (३६, रा.धरणगाव), सुनील अलकारी (५८, रा.जळगाव), अनिता अलकारी (५२, रा.जळगाव), नंदा बाविस्कर (३३, रा.साळवा), व्ही.व्ही.इंगोले (४०, रा.जळगाव) या प्रवाशांचा समावेश आहे.

Story img Loader