नाशिक – राज्यातील बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत पणनमंत्री अब्दुल सत्तार हे समित्यांच्या अडचणी समजून न घेता निघून गेल्याच्या निषेधार्थ सोमवारी राज्यातील बाजार समित्यांनी पुकारलेल्या बंदमध्ये जिल्ह्यातील १५ बाजार समित्या सहभागी झाल्यामुळे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले. कांद्याच्या सर्वात मोठ्या लासलगावसह अन्य बाजारातही कांदा व धान्याचे व्यवहार पूर्णत: बंद होते. भाजीपाल्याची मुख्य बाजारपेठ असणारी नाशिक बाजार समिती केवळ सुरू होती. भाजीपाला हा नाशवंत माल असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून नाशिकसह लासलगाव येथे भाजीपाल्याचे लिलाव पार पडले. या ठिकाणी काळ्या फिती लावून लिलाव करण्यात आले.

राज्य कृषी पणन मंडळ आणि राज्य बाजार समिती संघाच्या वतीने पुणे येथे अलीकडेच आयोजित परिषदेत पणनमंत्री अब्दुल सत्तार हे बाजार समित्यांना भेडसावणारे प्रश्न ऐकून न घेताच निघून गेल्याचा आक्षेप आहे. पणन मंत्र्यांनी बाजार समित्यांचे प्रश्न ऐकून न घेण्याची वादग्रस्त भूमिका घेतली. याचा निषेध करण्यासाठी राज्यभर बंद पाळण्याचा निर्णय परिषदेत घेण्यात आल्याचे मालेगाव बाजार समितीचे सभापती अद्वय हिरे यांनी सांगितले. सोमवारी बंदमध्ये जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या सहभागी झाल्यामुळे सर्व व्यवहार थंडावले. लासलगाव बाजार समितीसह उपबाजारात कांदा व धान्याचे व्यवहार बंद होते. सध्या बाजार समितीत प्रतिदिन १० हजार क्विंटल आवक होते. दैनंदिन उलाढाल तीन ते चार कोटी रुपये असते. ही उलाढाल पूर्णत: थांबली होती. लासलगावसह जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांचे कामकाज बंद असल्याचे या बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी सांगितले. यामुळे सुमारे १०० कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला.

हेही वाचा >>>पैसे दामदुपटीच्या आमिषाने दोनशे कोटी रुपयांना फसवणूक, लासलगाव पोलिसांत गुन्हा

मालेगाव बाजार समिती तसेच उपशाखांसह जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांचे कामकाज बंद राहिले. या बंदची पूर्वकल्पना बाजार समित्यांनी आधीच दिली होती. त्यामुळे कांदा अन्य कृषिमाल शेतकऱ्यांनी विक्रीस नेला नाही. बाजार समितीतील आवार ओस पडले होते. समितीतील कर्मचारी वगळता परिसरात कुणी नव्हते.

नाशिकमध्ये भाजीपाल्याचे लिलाव

नाशिक बाजार समितीत मुख्यत्वे भाजीपाल्याचे लिलाव होतात. समिती एक दिवस बंद राहिली तरी भाजीपाला खराब होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते. दुसऱ्या दिवशी जास्त आवक होऊन भाव कोसळतात. शेतकऱ्यांना कमी किंमतीत माल विकावा लागतो. त्यामुळे नाशिक बाजार समितीचे कामकाज सुरू ठेवण्यात आल्याचे सभापती देविदास पिंगळे यांनी सांगितले. संपाच्या दिवशी व्यापारी, आडते व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून लिलाव प्रक्रिया पार पाडली.