नाशिक : कांदा दरात सुधारणा होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी लासलगावसह नांदगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडला. क्विंटलला सरसकट दीड हजार रुपये अनुदान देण्याची मागणी करत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातही ठिय्या दिला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंदोलनामुळे लासलगाव बाजार समितीत लिलाव दिवसभर ठप्प झाल्याने पालकमंत्री दादा भुसे यांना मुंबईहून लासलगावला धाव घ्यावी लागली. मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर सायंकाळी आंदोलन मागे घेण्यात आले. सध्या कांद्याला प्रति क्विंटल केवळ ५०० ते ६०० रुपये भाव मिळत असून त्यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. शासन कुठलीही उपाययोजना करीत नसल्याचा आक्षेप घेत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वाखाली लासलगाव बाजार समितीत शेतकरी जमा झाले. सकाळच्या सत्रात सुमारे २० हजार क्विंटल कांदा विक्रीसाठी आला होता. दरात पुन्हा घसरण होऊ लागल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.