नाशिक – पावसामुळे एक एकरमध्ये केवळ आठ ते १० क्विंटल उत्पादन झाले. कांदा विक्रीच्या प्रतीक्षेत शेतात पडून आहे. एक ते १० डिसेंबर या कालावधीत पाच हजारापर्यंत भाव होते. परंतु, शेतातील कांदा काढेपर्यंत भाव कमालीचे घसरले. गतवर्षी हीच स्थिती झाल्यामुळे पीक कर्जाची परतफेड करता आली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार व आमदारांनी २० टक्के निर्यातशुल्क हटविण्याची मागणी केली आहे. कांद्याचा प्रश्न किती गहन आहे, हे हिंदुत्ववादी नेते, राज्याचे मंत्री नितेश राणे यांच्या लक्षात यावे आणि त्यांनीही पाठपुरावा करावा, या उद्देशाने बागलाण तालुक्यातील धार्मिक कार्यक्रमात आपण त्यांना कांद्याची माळ घातली, अशी प्रतिक्रिया कजवाडे येथील शेतकरी महेंद्र सूर्यवंशी यांनी दिली.
बागलाण तालुक्यातील चिराई येथे सोमवारी रात्री हा प्रकार घडला होता. एका धार्मिक कार्यक्रमासाठी सोमवारी रात्री नऊ वाजता राणे यांनी हजेरी लावली. या ठिकाणी बोलण्यासाठी ते उभे राहताच व्यासपीठावर अचानक महेंद्र सूर्यवंशी (३०, कजवाडे, ता. मालेगाव) हा शेतकरी आला. त्याने काही कळण्याच्या आत कांद्याची माळ राणे यांच्या गळ्यात घातली. मंत्री राणे यांनी त्यास विरोध केला नाही. या शेतकऱ्याला थांबवा, त्यांच्या समस्या ऐकून घेऊ, असे त्यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्याने ध्वनिक्षेपकावर बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी कोणताही गुन्हा जायखेडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला नाही. संशयित सूर्यवंशी याची चौकशी करण्यात आली. कांद्याची माळ मंत्र्यांना घालण्यामागे त्याची चांगली भावना होती. त्यामुळे पोलिसांनी नोटीस बजावत त्याची मुक्तता केली. पुन्हा असे करणार नाही, असे संबंधिताकडून लिहून घेण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा – सारंगखेडा घोडे बाजारात १० दिवसात तीन कोटी रुपयांची उलाढाल
हेही वाचा – जळगाव जिल्ह्यात खासगी बस उलटून महिलेचा मृत्यू, चार प्रवासी जखमी
कांद्याची माळ घालण्याच्या विचाराप्रत ते का आले, याविषयी सूर्यवंशी यांनी ‘लोकसत्ता’कडे माहिती दिली. धार्मिक कार्यक्रमात मंत्र्यांना कांद्याची माळ घालून व्यत्यय आणल्याबद्दल आपण कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव तालुक्यातील नागरिकांची माफी मागण्याचा प्रयत्न केला. परंतु, ध्वनिक्षेपकावर बोलता आले नाही. मालेगाव तालुक्यातील कजवाडे येथे आपली पाच एकर शेती आहे. यातील एक एकर क्षेत्रात कांदा लावला होता. पावसामुळे उत्पादन घटले. साडेतीन ते चार हजार रुपये असणारे भाव दोन हजार रुपयांपर्यंत खाली घसरले. आठ ते १० क्विंटल कांदा आ्जही शेतात पडून आहे. मागील वर्षी अशीच स्थिती होऊन नुकसान सहन करावे लागले. तत्पूर्वी तीन वर्ष आपण सलग पीक कर्ज फेडत होतो. गेल्या वर्षीपासून ते फेडता आले नाही. १० ते १२ बकऱ्या घेऊन जोडधंदा करण्याचा प्रयत्न केला. परंतु, वडिलांच्या आजारपणात बकऱ्याही विकाव्या लागल्या. सर्व लोकप्रतिनिधी निर्यात शुल्क हटविण्याची मागणी करत आहेत. मंत्री नितेश राणे यांनीही यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.