भाव घसरल्याने लासलगावात लिलाव बंद पाडले, ठिकठिकाणी तीव्र पडसाद
नाशिक : केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने जिल्ह्य़ातील शेतकरी आक्रमक झाला असून मंगळवारी जिल्ह्यात त्याचे विविध आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र पडसाद उमटले. सटाणा तालुक्यात करंजाड येथे शेतकऱ्यांनी ठिय्या देत तासभर शिर्डी-साक्री महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. मुंबई-आग्रा आणि नाशिक-पुणे महामार्गावर असेच आंदोलन झाले. कळवण येथे सर्वपक्षीय आंदोलन झाले. लासलगाव बाजार समितीत भाव घसरल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. असे प्रकार अनेक ठिकाणी घडले.
शासनाने सोमवारी अचानक कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने मंगळवारी बाजार समित्यांच्या लिलावाच्या दुपारच्या सत्रात भाव हजार रुपयांनी घसरले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली . बागलाण, मालेगाव, मनमाड, नाशिक आदी भागात त्याचे पडसाद उमटले. लासलगाव, सायखेडा येथे शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. नाशिक-पुणे महामार्गावर शिंदे टोल नाका येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रास्तारोको करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना कांदे भेट देण्याचा प्रयत्न केला. हे कांदे पोलिसांनी ताब्यात घेतले.
संघटनेने प्रशासनाला निवेदन दिले. सरकारने तुघलकी पध्दतीने निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याचा आरोप स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. संपूर्ण हंगामात कांदा दोन, चार रूपये किलोने विक्री झाला. तेव्हा केंद्र सरकारने कुठलीही संवेदनशीलता दाखविली नाही. सर्वसामान्यांना दिलासा द्यायचा असेल तर इंधनाचे दर कमी करावेत, शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम करू नये, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे.
नामपूर बाजार समितीत राज्य कांदा उत्पादक संघटनेने वाणिज्य मंत्रालयाला भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्याचे प्रतिकात्मक आंदोलन केले. सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास शिर्डी—साक्री महामार्गावरील करंजाड येथील उपबाजार समितीसमोर संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याने भरलेला ट्रॅक्टर आडवा लावून ठिय्या दिला. यावेळी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी देखील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. शेतकऱ्यांनी कांद्याला दोन पैसे मिळतील म्हणून सर्व धोके पत्करून चाळीत कांदा साठवला आहे. आजच्या घडीला ढगाळ वातावरणामुळे तो देखील खराब होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दुसरीकडे अचानक निर्यातबंदी केली. त्यामुळे कांद्याचे भाव कोसळून शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावेळी आंदोलकांनी निर्यातबंदी तत्काळ उठवावी, या मागणीचे निवेदन आमदारांना दिले. प्रहार संघटना देखील कांदा प्रश्नी आक्रमक झाली. संघटनेचे तालुकाध्यक्ष तुषार खैरनार, कपिल सोनवणे यांनी सटाणा तहसील आवारातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन के ले. प्रशासनाच्या आश्वसनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सटाणा बाजार समितीच्या प्रवेशद्वार जवळ सकाळी शेतकऱ्यांनी मालेगाव रस्त्यावर ठिय्या देऊन वाहतूक अडवली.
उमराण्यात आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत
निर्यात बंदीचा निर्णय घेताच कांदा दर घसरल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मालेगाव तालुक्यातही ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध केला. निर्यात बंदी त्वरित उठविण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी के ली. सकाळी नऊ वाजता लिलाव सुरू होण्याच्या वेळी उमराणे येथे जाणता राजा मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांच्या नेतृत्वाखाली कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्याने अर्धा तास वाहतूक खोळंबली होती. पोलीस, महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर सकाळी ११ वाजता लिलाव सुरू झाले. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कांद्याच्या कमाल दरात प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी घट झाली असून ३३०० रुपयांवरुन २८०० रुपयांपर्यंत हा दर घसरल्याचे दिसून आले.