दरघसरणीमुळे ग्राहकांना दिलासा, शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी 

नाशिक : कांद्याच्या दरातील घसरणीने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे, तर ग्राहकांना मात्र दिलासा मिळणार आहे. सर्वसाधारणपणे दिवाळीनंतर कांदा ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आणतो. यंदा मात्र तो शेतकऱ्यांना रडवण्याची शक्यता आहे.

दिवाळीच्या दहा दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी उघडलेल्या बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरांची घसरण कायम होती. बाजार बंद होण्याच्या दिवशीच्या तुलनेत तो उघडण्याच्या दिवशी कांद्याच्या प्रति क्विंटल दरांत सरासरी १२१ ते १५० रुपयांनी घसरण झाली. सोमवारी जुन्या उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी ८०१, तर नवीन लाल कांद्याला १५५१ रुपये दर मिळाला.

गेल्या महिन्यांत कांद्याने हंगामात प्रथमच प्रतिक्विंटल २१०० रुपयांचा टप्पा गाठला होता. देशांतर्गत बाजारात माल नसल्याने नाशिकच्या कांद्याचे भाव वधारल्याचे सांगितले गेले; परंतु ही तेजी दोन दिवसांत ओसरली. त्यामागे व्यापाऱ्यांची खेळी असल्याची चर्चा सुरू झाली. संबंधितांनी आपला माल जादा भावाने देशांतर्गत बाजारात पाठविण्यासाठी कृत्रिम तेजी निर्माण केल्याचे इतर जिल्ह्य़ांतील व्यापारी सांगतात. त्यानंतर पुढील काही दिवस दरातील घसरण सुरू राहिली आणि आजही ती सुरू आहे. परिणामी शेतकरी धास्तावले आहेत. दरात घसरण होत राहिली तर कांद्या स्वस्त होऊन बाजार बंद होण्याच्या दिवशी म्हणजे १ ऑक्टोबरला उन्हाळ कांद्याला सरासरी ९५१, तर लाल कांद्याला सरासरी १६७१ रुपये दर मिळाला होता. सोमवारी हा दर अनुक्रमे १५० आणि १२१ रुपयांनी खाली आला. या दिवशी उन्हाळ कांद्याची ७९९८ क्विंटल, तर लाल कांद्याची ५०७ क्विंटल आवक झाली. या वर्षी पावसाअभावी नवीन कांद्याचे विलंबाने आगमन झाले. बाजारात हा कांदा येत असला तरी त्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. त्याची आवक जशी वाढेल, तसा दरांवर परिणाम होईल, अशी धास्ती उन्हाळ कांद्याची साठवणूक करणाऱ्यांना आहे.

Story img Loader