लोकसत्ता वृत्तविभाग
मनमाड : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी उन्हाळ कांद्याला सरासरी ३३०० रुपये क्विंटल भाव मिळाला. केंद्र सरकारने मागील आठवडय़ात कांदा निर्यातीवर बंदी आणली. कांद्याचे दर क्विंटलला ३७०० रुपयांवर असताना निर्यातबंदीच्या निर्णयाने भाव गडगडले. या काळात कांद्याचे भाव सरासरी ८०० रुपयांनी घसरले होते. अडकलेला कांदा परदेशात पाठविण्यास हिरवा कंदील मिळाल्याने संभाव्य नुकसान काही अंशी टळले.
दक्षिणेकडील राज्यांत पावसामुळे कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे तिथे नव्या कांद्याचे उत्पादन कमी होईल. त्यामुळे सध्या बाजारपेठेमध्ये नाशिकच्या कांद्याला मागणी वाढली आहे. वातावरणामुळे चाळीत साठवलेला कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे शेतकरी शक्य तितक्या लवकर कांदा बाजारात नेण्याच्या मानसिकतेत आहे. या घटनाक्रमाचा परिणाम सध्या कांद्याच्या दरावर झाल्याचे दिसून येत आहे.
कांदा निर्यातबंदीच्या निर्णयानंतर गडगडलेल्या दरात सुधारणा होत असून आठवडाभरात कांद्याचे दर पुन्हा एकदा क्विंटलला ३४०० रुपयांवर पोहोचले. गुरुवारी मनमाड बाजारात कांद्याची २७१ ट्रॅक्टर इतकी आवक झाली. उन्हाळ कांदा ५०० ते ३५३७, सरासरी ३३०० रुपये तर लहान कांदा १००० ते २०६०, सरासरी १७४० रुपये क्विंटल असा भाव होता. परराज्यातून वाढती मागणी आणि पावसामुळे चाळीत साठवलेला खराब होणारा माल याचा हा परिणाम असल्याचे बोलले जाते.