मनमाड – मध्यंतरी स्थिर असलेले कांद्याचे दर पुन्हा एकदा घसरू लागल्याने कांदा उत्पादकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. देशांतर्गत बाजारात उन्हाळ कांद्याची आवक वाढल्याने दरात मोठी घसरण होत आहे. आठवडाभरात कांदा दरात २०० ते ४०० रुपयांनी घसरण झाल्याचे सांगण्यात येते.
जिल्ह्यातही सध्या कांद्याची मोठी आवक होत आहे. राज्यभरात आवक वाढली असून मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक झाल्याने दर कोसळले. सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याची १६८ ट्रॅक्टर इतकी आवक झाली. चांगल्या दर्जाच्या कांद्याला २००० ते २३४७ रुपये तर सर्वसाधारण १६०० ते २००० रुपये असे भाव होते. उन्हाळ कांद्याची १७ ट्रॅक्टर इतकी आवक झाली. त्यास ७२१ ते २०७५ तर, सरासरी २००० रुपये क्विंटल असे भाव होते. सफेद कांद्याला सरासरी ११२० रुपये क्विंटल असे भाव मिळाले. मक्याची १२ ट्रॅक्टर इतकी आवक झाली. सरासरी २१९० रुपये क्विंटल असे भाव मिळाले.