नाशिक : महानगरांमध्ये परदेशी कांद्याचे आगमन, स्थानिक कांद्यासाठी व्यापाऱ्यांना साठवणूक मर्यादेचा निकष आणि नव्या लाल कांद्याची सुरू झालेली आवक या घटनाक्रमाचा स्थानिक कांद्यावर परिणाम स्थानिक कांद्याच्या भावात घसरण कायम राहण्यात झाली आहे. आदल्या दिवशीच्या तुलनेत उन्हाळ कांद्याचे भाव बुधवारी पुन्हा ६०० रुपयांनी कमी होऊन क्विंटलला ३४०० रुपयांवर आले. नव्या लाल कांद्याच्या दरात अल्पशी वाढ होऊन त्यास ३३३० रुपये सरासरी दर मिळाला.
कांदा दर नियंत्रित करण्यासाठी सरकारी पातळीवरून झालेल्या प्रयत्नांमुळे मोठे नुकसान झाल्याची संतप्त प्रतिक्रिया उत्पादकांकडून व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी क्विंटलला साडेसहा ते सात हजारांचा टप्पा गाठणाऱ्या कांद्याच्या दरात अल्पावधीत तीन ते साडेतीन हजार रुपयांनी घट झाली आहे. गेल्या आठवडय़ात कांदा साठवणूक मर्यादेच्या निकषामुळे व्यापाऱ्यांनी लिलावातून अंग काढून घेतले होते. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये चार दिवस कांद्याचे लिलाव बंद राहिले. हा निकष रद्द करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली. राज्य सरकारने केंद्राकडे साठवणूक मर्यादेत मोठी वाढ करण्याची मागणी केली, परंतु ती आजतागायत मान्य झाली नाही. केवळ आज खरेदी केलेला कांद्याची प्रतवारी करणे, गोणीत भरणे तत्सम कामांसाठी तीन दिवस साठवण्याची मुभा दिली. या सवलतीचा कोणताही लाभ झाला नाही.
दुसरीकडे किरकोळ बाजारात कांद्याने शंभरी गाठल्याने सरकारने परदेशी कांद्याला भारताचे दरवाजे उघडले. अफगाणिस्तान, इराण या देशांतून कांदा देशात दाखल होऊ लागला आहे. त्याचा महानगरांमध्ये पुरवठा झाल्यावर स्थानिक कांद्याची मागणी कमी होईल, या साशंकतेतून भाव गडगडण्यास सुरुवात झाली. बुधवारचा दिवसही त्यास अपवाद राहिला नाही. लासलगाव या मुख्य बाजार समितीत सकाळच्या सत्रात साडेपाच हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होऊन त्यास सरासरी ३४०० रुपये भाव मिळाला. आदल्या दिवशी हा भाव चार हजार रुपये होता. नव्या लाल कांद्याच्या दरात २३० रुपयांनी वाढ होऊन ते ३३३० रुपयांवर गेले. लाल कांद्याची १८० क्विंटलची आवक होती.
केंद्र सरकार अफगाणिस्तानमधून एक लाख मेट्रिक टन आयात करत आहे. त्यामुळे स्थानिक कांद्याची मागणी काही अंशी कमी होईल. याचा परिणाम दरावर होत असल्याचे लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी सांगितले. सध्या बाजार समित्यांमध्ये आवक वाढली आहे. याचाही परिणाम दरावर होत असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. परदेशातून आयात केलेला कांदा महानगरांमध्ये वितरित होत आहे. लासलगावप्रमाणे इतर बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची घसरण कायम राहिली.
मनमाडात ९५० रुपयांनी घसरण
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी कांद्याच्या भावात ९५० रुपयांची घसरण झाली. बाजार समितीत उन्हाळ कांद्याची ३४३ ट्रॅक्टर इतकी आवक झाली. उन्हाळ कांद्याला १००० ते ३७६० सरासरी ३४०० रुपये असे भाव राहिले. मंगळवारी उन्हाळ कांद्याला ४३५० रुपये सरासरी, तर सोमवारी सरासरी पाच हजार रुपये क्विंटल असे भाव होते. केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या निर्बंधामुळे कांद्याच्या भावात घसरण होत आहे. सद्य:स्थितीत आर्थिकदृष्टय़ा अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळणे गरजेचे आहे. त्यातच दीपावलीचा क्षण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.