भाव आणखी कोसळण्याची भीती; आर्थिक गणित बिघडण्याची शेतकऱ्यांना चिंता
महिन्याभरापूर्वी उन्हाळ कांद्याला प्रति क्विंटल सरासरी ४,६५१, तर नव्या लाल कांद्याला ३१०० रुपये भाव मिळत होता. आता तो अनुक्रमे १,८०० आणि २,५५१ रुपयांपर्यंत खाली आला आहे. महिना-दीड महिन्यात कांदा दरात जवळपास ४० ते ४५ टक्क्यांनी घसरण झाली. पुढील काळात नव्या कांद्याची आवक वाढणार आहे. त्याचा परिणाम भावावर होईल. खरिपात महागडी बियाणे घेऊन कांदा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक समीकरण विस्कळीत होण्याच्या मार्गावर आहे.
क्विंटलला कधीतरी मिळणाऱ्या पाच ते सहा हजार रुपयांच्या दरामुळे शेतकरी या नगदी पिकाकडे मोठय़ा प्रमाणात आकृष्ट झाले. एरवी ५०० ते हजार रुपये किलोने मिळणाऱ्या बियाण्यांसाठी कित्येकांनी चार हजार रुपये मोजले. मजुरी वा तत्सम बाबींमुळे उत्पादन खर्च वाढला. त्या तुलनेत अपेक्षित परतावा मिळण्याची शक्यता मात्र धूसर बनल्याचे चित्र आहे. निर्यात खुली झाली की, घसरण थांबेल, अशी उत्पादकांना आशा आहे. त्यामुळे कांदा उत्पादक संघटनेसह बाजार समित्या, लोकप्रतिनिधी आदींकडून मुख्यत्वे निर्यातबंदी हटविण्याची मागणी होत आहे.
मागील दोन महिन्यांत कांदा दरात कमालीचे चढ-उतार झाले. कांद्याच्या सर्वात मोठय़ा लासलगाव बाजार समितीत नोव्हेंबर महिन्यात एकूण दोन लाख ८८ हजार ३०६ क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली होती. त्यास सरासरी ३,६०८ रुपये दर मिळाले. याच काळात नवीन लाल कांद्याची नऊ हजार ५०६ क्विंटल आवक झाली. त्याला सरासरी ३,४६८ रुपये क्विंटल भाव मिळाला. गेल्या महिन्यात नव्या लाल कांद्याची कमी असणारी आवक डिसेंबरच्या सुरुवातीला चांगलीच वाढत आहे. १ ते ७ डिसेंबर या काळात ८८ हजार ५७६ क्विंटल उन्हाळची आवक होऊन त्याला सरासरी २,२१७ रुपये, तर २५ हजार क्विंटल लाल कांद्याची आवक होऊन त्यास २,७७५ रुपये दर मिळाला.
नवा कांदा बाजारात येऊ लागल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याच्या विक्रीवर भर दिला आहे. गेल्या सोमवारी उन्हाळ कांद्याच्या जवळपास बरोबरीने नव्या कांद्याची आवक झाली. नव्या कांद्याची आवक आणखी वाढणार आहे. सध्या घाऊक बाजारात किलोला १५ ते २५ रुपये भाव मिळतो. आवक वाढल्यानंतर हे दर आणखी कोसळतील. घाऊक बाजारातील सद्य:स्थिती केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे पत्राद्वारे मांडली असल्याचे लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी सांगितले. दरघसरण थांबविण्यासाठी निर्यातीला चालना देण्याची गरज आहे. त्यामुळे तातडीने निर्यातबंदी आणि व्यापारी वर्गावर साठवणुकीचे घातलेले निर्बंध हटविण्याची मागणी लासलगाव बाजार समितीने केली.
देशांतर्गत बाजारात मध्यंतरी तुटवडा असल्याने स्थानिक कांद्याची मागणी वाढून दर वधारले होते. निर्यातबंदी असतानाही ते सहा हजारांच्या घरात गेले. गेल्या वर्षी याच काळात कांद्याने १० हजारांचा टप्पा ओलांडला होता. अपवादात्मक परिस्थितीत भाव वाढतात. यामुळे उत्पादकांच्या अपेक्षा वाढल्या असल्या तरी खरीप कांद्याचे दर वाढण्याची शक्यता नसल्याचे या क्षेत्रातील जाणकार सांगतात.
या महिन्यात खरीप कांदा मोठय़ा प्रमाणात येऊन भावात आणखी घसरण होईल. निर्यात खुली करूनही फारसा फरक पडणार नाही. सध्याच्या दोन ते अडीच हजार रुपये दरात निर्यात अशक्य आहे. बाजारभाव घसरण्यामागची वस्तुस्थिती वेगळी आहे. मध्यंतरी निर्यातबंदी असतानाही भाव पाच हजार रुपयांवर गेले होते. खरिपाच्या पाठोपाठ महिन्याभरात लेट खरीप कांदा सुरू होईल. कर्नाटक, गुजरात, राजस्थानमधून चांगली आवक झाल्यास स्थानिक कांद्याचे दर आणखी घसरतील. नाशिकचा कांदा उत्तर भारतात जातो. वाहतुकीसाठी अधिक खर्च लागतो. संबंधित राज्यांना राजस्थान वा लगतच्या भागातून कांदा उपलब्ध झाल्यास वाहतूक खर्चाचा भार कमी होतो.
– चांगदेवराव होळकर, माजी उपाध्यक्ष, नाफेड