लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक लक्षणीय वाढली असून दरात साधारणत: २२ दिवसात सुमारे हजार रुपयांनी घसरण झाली आहे. मंगळवारी लासलगाव बाजार समितीत २८ हजार १२५ क्विंटलची आवक होऊन प्रतिक्विंटलला सरासरी ३८०० रुपये भाव मिळाला.
आठवडाभरापासून घाऊक बाजारात लाल कांद्याची आवक वाढली आहे. १९ नोव्हेंबर रोजी लासलगाव बाजारात १० हजार क्विंटलची आवक झाली होती. त्यास सरासरी ४७०० रुपये भाव मिळाला होता. याचा विचार करता आवक तिपटीने वाढली असून दर कमी होत आहेत. मंगळवारी लाल कांद्याला किमान ११००, कमाल ५२०० आणि सरासरी ३८०० रुपये दर मिळाले. पुढील काळात आवक आणखी वाढत जाईल आणि दर कमी होतील, असे बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले.
आणखी वाचा-सेवानिवृत्तवेतन धारकांच्या मदतीला टपाल विभाग, जिल्ह्यात १७०० पेक्षा अधिक जणांना डीएलसी योजनेचा लाभ
मनमाडसह अन्य बाजार समित्यांमध्ये हेच चित्र आहे. मनमाड बाजार समितीत १५ दिवसांपूर्वी साडेचार ते पाच हजारावर गेलेला कांदा चार दिवसात चार हजारांच्या खाली आला आहे. मंगळवारी या बाजारात लाल कांद्याला सरासरी ३५०० रुपये क्विंटल असा भाव मिळाला. सफेद कांद्याला सरासरी २५९५ रुपये क्विंटल असा भाव होता.