कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा इशारा
नाशिकसह राज्यात कांदा उत्पादक वेगवेगळ्या विवंचनेत सापडला आहे. हे दृष्टचक्र भेदण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आवाज उठविणार आहे. आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुका लक्षात घेता राजकीय मंडळींच्या सभा उधळून लावण्याचा इशारा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भारत दिघोळे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
राज्यात कांदा हे अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकमेव नगदी पीक आहे. आधीच संकटात सापडलेल्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे अर्थचक्र हे कांदा बाजारभावाच्या चक्रावर अवलंबून असते. शहरी ग्राहकांच्या मानसिकतेतून कांदा हा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकून सरकार कांदा दरावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी यापुढील काळात राज्य आणि केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात संघटना आर-पारची लढाई लढणार आहे.
येत्या लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्यात कोठेही सत्ताधारी, विरोधी पक्षांच्या नेत्यांची सभा असेल तर ती सभा उधळून लावण्यात येईल. त्याआधी भाजपचे अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदींची भेट घेऊन कांदा प्रश्नाच्या गंभीरतेवर चर्चा करणार असल्याचे दिघोळे यांनी सांगितले. संघटनेच्या माध्यमातून देश-विदेशातील नवनवीन बाजारपेठ शोधून कांदा उत्पादकांना शाश्वत करण्याचे काम संघटना करणार आहे. सेंद्रिय कांदा आणि ग्राहकाभिमुख उत्पादन करण्यावर भर देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या वेळी नितीन दिघोळे, सतीश दिघोळे उपस्थित होते.
राज्यात पुणे, नाशिक येथे कांदा प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी संघटना सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. राज्यातील कांदा उत्पादकांची माहिती संकलित करून नवमाध्यमातून दैनंदिन बाजारभाव, हवामान या संदर्भातील माहिती पुरवून कांदा उत्पादनातील नवनवे तंत्रज्ञान, नवे वाण, आंतरराष्ट्रीय मागणी, निर्यातीमधील अडचणी, देशांतर्गत उत्पादन याबाबत वेळोवेळी जागृत करण्यात येणार आहे. कांदा उत्पादकांना उत्पादन तंत्रज्ञान, काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि विक्री व्यवस्था याबाबत माहिती पुरविणे, कांदा उत्पादकांची वर्षांतून एकदा परिषद घेऊन त्यांच्या विविध अडचणी समजून घेत कांद्याची शेतीही शाश्वत होऊ शकते, असा विश्वास कांदा उत्पादकांमध्ये निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भारत दिघोळे यांनी सांगितले.