नाशिक – कांदा निर्यात शुल्क वेळेवर रद्द न केल्याने भाव पडले. ही सरकारची जबाबदारी आहे. नाफेडमार्फत होणाऱ्या खरेदीवर आमचा भरवसा नाही. त्यामुळे कांद्याला आता सरसकट दीड हजार रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केली.
दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आलेल्या शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र सोडले.

महायुतीच्या नेत्यांनी सातबारा कोरा करण्याचे दिलेले आश्वासन पाळले नाही. उद्योगपतींचे कर्ज माफ केले, पण शेतकऱ्यांना मदत केली नाही. पुढील काळात या प्रश्नासाठी सरकारच्या विरोधात संघर्षाचा इशारा त्यांनी दिला. मायक्रो बँका १८ टक्क्यांनी कर्ज देतात. संबंधितांची वसुली करणाऱ्या गुंडांना आम्ही दणका देणार असल्याचे शेट्टी यांनी जाहीर केले.

राज्यात अनेक वेळा आपत्ती येऊनही पीक विमा कंपन्यांनी ५० हजार कोटी रुपये कमविले. मागच्या काळात बनावट पीक विमे काढले. सरकार अधिकाऱ्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे एकत्र येणार असेल तर आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

नाशिक जिल्हा बँकेला सरकारने भागभांडवल दिल्यास बँक पूर्वपदावर येईल. जिल्ह्यातील शेतकरी जिल्हा बँकेवर अवलंबून आहेत. थकबाकीदार असल्याने त्यांना कर्ज मिळत नाही. सावकारी व इतर बँकांकडून कर्ज घ्यावे लागते, याकडे शेट्टी यांनी लक्ष वेधले.

परभणी जिल्ह्यात दीड लाखांच्या कर्जामुळे शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्याच रात्री त्याच्या पत्नीने आत्महत्या केली. त्या महिलेच्या पोटात सात महिन्याचा गर्भ होता, असे शेट्टी यांनी सांगितले. सुनील तटकरेंच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक वाटी आमरस आणि एक मोदक खाण्यासाठी दीड कोटी रुपये खर्च केला. तिथे हेलिपॅड बनवले. हजारो कोटी तिकडे खर्च करताना शेतकऱ्यांना एक रुपयाही देत नाही, याबद्दल सरकारला लाज वाटत नाही, अशा शब्दांत त्यांनी अमित शहा यांच्या दौऱ्यावर झालेल्या खर्चावर टिप्पणी केली.