नाशिक – त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतीने दोन नोव्हेंबर रोजी दीपावली पाडव्याच्या मुहूर्तापासून ऑनलाईन दर्शन सुविधा सुरू करण्यात येत असल्याची माहिती देवस्थानच्या वतीने विश्वस्त पुरुषोत्तम कडलग, सत्यप्रिय शुक्ल यांनी दिली. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थान येथे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. यामुळे वादाचे प्रसंग उद्भवतात. या पार्श्वभूमीवर देवस्थानच्या वतीने ऑनलाईन दर्शन व्यवस्था खुली करण्यात आली आहे. याआधीही हा प्रयोग झाला. मात्र तांत्रिक अडचणी अभावी हे काम रेंगाळले. आता दीपावली पाडव्यापासून उपक्रमास आरंभ होत आहे.
देवस्थानच्या वतीने दिवसभरातून चार हजार भाविकांना सुविधेचा लाभ घेता येणार आहे. यात दोन हजार भाविक हे कुठल्याही ठिकाणाहून याची नोंदणी दुरध्वनीद्वारे करू शकतात. दोन हजार भाविक हे प्रत्यक्ष त्र्यंबकेश्वर येथे येऊन करू शकतात. यासाठी शहरात आलेल्या भाविकांना त्र्यंबकेश्वर येथे शिवप्रसाद भक्तनिवास आणि कुशावर्त तीर्थाजवळ ही व्यवस्था करण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेतांना ज्या दिवशी ऑनलाईन दूरध्वनीद्वारे सकाळी साडेपाच ते मंदिर बंद होईपर्यंत म्हणजे रात्री आठपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे. भाविकांना एक दिवस अगोदर किंवा नंतर दर्शनाचा लाभ मिळणार नाही. मात्र ऑनलाईन दूरध्वनीद्वारे नोंदणी केलेले भाविक कितीही दिवस अगोदर दर्शन करू शकतो.
हेही वाचा – जिल्ह्यात दोन दिवसात ३३ संशयितांविरुध्द गुन्हे, अवैध व्यवसायांविरुध्द पोलिसांची कारवाई
हेही वाचा – टँकर धडकेने दुचाकीवरील चार जणांचा मृत्यू
नाेंदणी झाल्यानंतर सदर पास रद्द करणे, परत करणे किंवा अन्य व्यक्तीला सोडता येणार नाही, एका व्यक्तीला एका पासद्वारे चार व्यक्तींची नोंदणी करता येणार आहे. मात्र त्यासाठी चारही व्यक्तींचे ओळखपत्र व नाव टाकणे अनिवार्य असेल. तसेच भाविक शहरात आल्यास एका वेळेस एकाच भाविकाची नोंदणी होईल. उत्तर महाद्वारावर भाविक आल्यानंतर त्यांना बारकोड असलेला देणगी दर्शन पास दाखवून संगणक ओळख पटवणे आवश्यक असेल. ही सुविधा अपंग लोकांसाठी मोफत असेल. मात्र त्यासाठी अपंग प्रमाणपत्र आवश्यक आहे. दरम्यान, देवस्थानच्या वतीने महाशिवरात्र, सर्व श्रावणी सोमवार, त्रिपुरारी पौर्णिमा व श्री संतश्रेष्ट निवृत्तीनाथ महाराज यात्रेचे तीन दिवस ही सुविधा भाविकांसाठी बंद असेल. भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले.