लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : करोना संसर्गामुळे शाळा, महाविद्यालय बंद असल्याने पालकांकडून शैक्षणिक शुल्क भरण्यास टाळाटाळ होत आहे. या संदर्भात शहरातील खासगी शाळांची शिखर संस्था असलेल्या नाशिक स्कू ल असोसिएशनने शाळा प्रतिनिधींची  बैठक घेत विद्यार्थ्यांनी चालू शैक्षणिक शुल्क भरले नसल्यास पुढील सात दिवसांत त्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन शिक्षण बंद राहील, परंतु त्यांचा शैक्षणिक प्रवेश अबाधित राहील, अशी भूमिका संघटनेने घेतली असल्याचे  पदाधिकारी रतन लथ यांनी सांगितले. याबाबत शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना निवेदन देण्यात आले आहे. संघटनेच्या या निर्णयामुळे पालक वर्गात अस्वस्थता पसरली आहे.

मार्चमध्ये करोनाचा संसर्ग फै लावण्यास सुरुवात झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात शाळा बंद करण्यात आल्या. जून महिन्यात शाळांचा श्रीगणेशा ऑनलाइन पद्धतीने झाला. परंतु, या काळात करोना महामारीमुळे अनेक पालकांचा रोजगार गेल्याने पालकांनी शैक्षणिक शुल्क भरण्यास असमर्थता दर्शविली. काही पालकांनी मागील शैक्षणिक वर्षांचे शुल्क न भरता नव्या शैक्षणिक वर्षांत पाल्याचा प्रवेश घेतला. नाशिक स्कू ल असोसिएशनने नव्या शैक्षणिक वर्षांत शुल्काचा एकही हप्ता न भरणाऱ्या आणि मागील वर्षांचे शुल्क बाकी असलेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण पुढील सात दिवसांत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

शाळा बंद असली तरी शिक्षण सुरू आहे. शाळेचे कर्जाचे हप्ते, शिक्षकांचा पगार, कर्मचाऱ्यांचा पगार, शाळा देखभाल खर्च सुरू आहे. शाळा स्तरावर येणाऱ्या अडचणींमुळे शिक्षकांना के वळ ५० टक्के  पगार दिला जात आहे. शिक्षक ५० टक्के  पगारावर काम करण्यास तयार नाही. असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Story img Loader