वातावरणात गारवा असल्याने सध्या दुष्काळसदृश स्थितीचे गांभीर्य काहीसे बाजूला पडले आहे. तथापि, नवीन वर्षांच्या सुरुवातीला जिल्ह्य़ातील धरणांमध्ये केवळ ३२ टक्के जलसाठा शिल्लक असल्याची समोर आलेली बाब पुढील संकट स्पष्ट करण्यास पुरेशी आहे. गंगापूर धरण समूहात ३८ टक्के तर सर्वात कमी म्हणजे २१ टक्के जलसाठा गिरणा खोऱ्यातील धरणांमध्ये आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २५ टक्के कमी जलसाठा आहे.
पावसाअभावी यंदा जिल्ह्य़ातील धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा होऊ शकला नाही. त्यामुळे पावसाळा संपुष्टात आल्यापासून दुष्काळाचे चटके सर्वदूर सहन करावे लागत आहेत. त्यात मराठवाडय़ासाठी जिल्ह्य़ातील धरणांमधून पाणी सोडणे क्रमप्राप्त ठरले. उपलब्ध पाण्याचा नियोजनपूर्वक आणि काटकसरीने वापर करणे आवश्यक असून त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूरमध्ये सध्या २७०४ दशलक्ष घनफूट म्हणजे ४८ टक्के जलसाठा आहे. या धरण समूहातील काश्यपी (३३ टक्के) तर गौतमी गोदावरीमध्ये (१५) जलसाठा आहे. पालखेड धरण समूहात एकूण ४४ टक्के जलसाठा आहे.
गतवर्षी हे प्रमाण याच काळात ६३ टक्के होते. पालखेड धरणात ४८२ दशलक्ष घनफूट, करंजवण २०५७, वाघाड १२२० दशलक्ष घनफूट असे हे प्रमाण आहे. ओझरखेड, पुणेगाव व तिसगावमध्ये एकूण १२२० दशलक्ष घनफूट म्हणजे ३८ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी हे प्रमाण २० टक्क्यांनी अधिक होते.
गिरणा खोऱ्यातील धरणांमध्ये अधिक गंभीर स्थिती आहे. चणकापूरमध्ये २०७७, पुनद १२७७, हरणबारी ८१५, केळझर ३२२, गिरणा धरणात केवळ २१ दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. या सर्व धरणांच्या एकत्रित विचार केल्यास त्यात केवळ २१ टक्के जलसाठा असून गतवेळी हे प्रमाण ४५ टक्के आहे. सद्य:स्थितीत शहरांसह ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या संकटाने डोके वर काढले आहे.
उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर अत्यावश्यक असून उन्हाळ्यात हे संकट अधिक गडद होणार आहे. नाशिक शहरात पाणी नियोजनाच्या संवेदनशील मुद्दय़ावरून कुरघोडीचे राजकारण रंगले. यावर पालिका प्रशासनाने सर्वसामान्यांना सहभागी करून वितरण प्रणालीचे परीक्षणही केले.
पाणी वितरणात गळतीचे प्रमाण मोठे असल्याचा फटका शहरवासीयांना अप्रत्यक्षपणे सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात टंचाईमुळे टँकरची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. पुढील काळात त्यात वाढ होणार असल्याने त्याचा आजपासून काटकसरीने वापर करणे क्रमप्राप्त ठरले आहे.
जिल्ह्य़ातील धरणांमध्ये ३२ टक्केच जलसाठा
वातावरणात गारवा असल्याने सध्या दुष्काळसदृश स्थितीचे गांभीर्य काहीसे बाजूला पडले आहे
Written by रोहित धामणस्कर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-01-2016 at 09:57 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Only 32 percent water storage in nashik district