नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीस अवघ्या पाच दिवसांचा अवधी शिल्लक असताना आतापर्यंत संपूर्ण विभागातून केवळ ४० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. आभासी सुविधा उपलब्ध होऊनही ही संख्या विस्तारलेली नाही. मागील निवडणुकीत विभागात दोन लाख ५३ हजार मतदार होते. यंदा नोंदणीला प्रतिसाद न मिळण्यामागे प्रमुख राजकीय पक्षांनी अद्याप जाहीर न केलेली उमेदवारी हे एक कारण असल्याचे सांगितले जाते.
हेही वाचा- नाशिक-मुंबई महामार्गावरील टोल वसुली थांबवा ; नाशिक सिटीझन्स फोरमची उच्च न्यायालयात मागणी
पक्षाने अधिकृत घोषणा केली की, उमेदवार नोंदणीसाठी प्रयत्न करतात. उमेदवारी जाहीर झाल्याविना उत्साहाचा अभाव अधोरेखीत होत आहे.
या मतदार संघात एक ऑक्टोबरला मतदार नोंदणीला सुरूवात झाली होती. सात नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. विहीत नमुन्यातील अर्ज क्रमांक १८ भरून द्यावा लागतो. अर्जासोबत रंगीत छायाचित्र, पदवी प्रमाणपत्र, जन्मतारखेचा पुरावा, निवासस्थान पुराव्याच्या सत्यप्रती (साक्षांकित) आदी कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. प्रारंभी, क्लिष्ट नियमांमुळे नोंदणीत इच्छुकांना अडचणी येत होत्या. कागदपत्रांचे साक्षांकन प्रशासनाने विहित केलेल्या व्यक्तींकडून करणे बंधनकारक होते. नोंदणीचा अर्ज जिथे सर्वसाधारण निवासस्थान आहे, तिथेच सादर करावा लागणार होता. यामुळे ऑफलाईन नोंदणीस अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. नंतर आभासी नोंदणीची सुविधा उपलब्ध झाली. त्यानंतर नोंदणीचा वेग काहिसा वाढला. विभागात आतापर्यंत आभासी आणि प्रत्यक्ष स्वरुपात ४० हजार प्राप्त झाल्याचे उपायुक्त रमेश काळे यांनी सांगितले.
हेही वाचा- नाशिक : शिवशाहीला आग, चालकाच्या सतर्कतेने ४२ प्रवासी सुखरूप
नाशिक जिल्ह्यात प्रत्यक्ष स्वरुपात सहा हजार १२६ आणि आभासी चार हजार ८०० अर्ज प्राप्त झाले आहेत. सात नोव्हेंबर अर्ज भरण्याची मुदत असली तरी २३ तारखेला मतदारांची प्राथमिक यादी प्रसिध्द होणार आहे. तोपर्यंत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे अधिकारी सांगतात. मागील निवडणुकीत विभागात अडीच लाखहून अधिक मतदार होते. यंदा ही संख्या तो आकडा गाठेल की नाही, याबद्दल साशंकता आहे. नाशिकचा विचार करता मागील निवडणुकीत जिल्ह्यात ४७ हजार मतदार होते. यावेळी हा आकडा जेमतेम ११ हजारावर पोहोचला आहे. अधिकाधिक मतदारांची नोंदणी व्हावी, यासाठी यंत्रणा प्रयत्नशील असल्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले. इच्छुकांना घरबसल्या अर्ज भरता येतो. प्रत्यक्ष स्वरुपात अर्ज शेवटच्या टप्प्यात मोठ्या संख्येने जमा केले जातात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, मतदारांची अल्प नोंदणी झाल्यामुळे या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी भाकपचे राज्य कार्यकारिणी सदस्य राजू देसले यांनी प्रशासनाकडे केली आहे.
इच्छुकांसह प्रशासनाचे उमेदवारीकडे लक्ष
या मतदारसंघात मागील निवडणुकीत काँग्रेस आघाडी विरुध्द भाजप अशी लढत झाली होती. काँग्रेस आघाडीचे डॉ. सुधीर तांबे यांनी भाजपच्या डॉ. प्रशांत पाटील यांना पराभूत केले होते. काँग्रेसकडून डॉ. तांबे यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार असल्याचे सांगितले जाते. पण पक्षाने अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यास काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी दुजोरा दिला. भाजपने कुणाला मैदानात उतरवायचे हे निश्चित केलेले नाही. पाचही जिल्ह्यातून इच्छुकांची संख्या मोठी असल्याचे भाजपचे प्रदेश पदाधिकारी लक्ष्मण सावजी यांनी सांगितले. या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस या पारंपरिक प्रतिस्पर्धांमध्ये लढत होणार आहे. दोन्ही पक्षांनी उमेदवारी जाहीर केलेली नसल्याने मतदार नोंदणी संथपणे पुढे सरकत असल्याचे प्रशासकीय यंत्रणेचे निरीक्षण आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर संबंधित व्यक्ती कामाला लागते. जास्तीतजास्त नोंदणी होण्यासाठी प्रयत्न केले जातात. यावेळी तसे वातावरण दृष्टीपथास पडलेले नाही.