नाशिक – धनगर समाजाला आदिवासींच्या आरक्षणाचा लाभ देऊ नये, यासाठी आदिवासी टायगर ग्रुप, अखिल भारतीय विकास परिषद आणि आसरा फाउंडेशनतर्फे सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथील बिरसा मुंडा चौकात रविवारी सकाळी ११ वाजता एक तास रास्ता रोको करण्यात आला.
सुरगाणा तहसीलदार प्रशांत कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास आदिवासी आसरा फाउंडेशनतर्फे पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आदिवासी समाजाला संविधानाने साडेसात टक्के आरक्षण दिले आहे. त्या आरक्षणाचा लाभ घेऊन आदिवासी समाजाला विविध योजना व शासकीय नोकरीचा लाभ मिळत आहे. धनगर समाजाला आदिवासी आरक्षण मिळेपर्यंत आदिवासी योजनांचा लाभ देऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २१ सप्टेंबरला केली. याचा विरोध म्हणून आदिवासी संघटनांनी आंदोलन केले.
हेही वाचा – नाशिकमध्ये प्रगतिशील साहित्य संमेलनाची तयारी
आंदोलनात मोहन गांगुर्डे, सखाराम भोये, अशोक गवळी, भास्कर भोये, संदीप भोये, मुरलीधर ठाकरे, चंद्रकांत भरसट, सचिन राऊत आदी सहभागी होते.