नाशिक – सार्वजनिक जलद वाहतुकीची गरज लक्षात घेऊन शहरात संकल्पित मेट्रो निओच्या रखडलेल्या प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी झाले आहे. नाशिकमध्ये मेट्रो निओ योग्य ठरेल की मोनोरेल, हलक्या वजनाची रेल्वे वा अन्य पर्याय, याबाबत महामेट्रोने केंद्र सरकारशी विचार विनिमय करावा, असे निर्देश राज्याच्या मुख्य आयुक्त सुजाता सौनिक यांनी दिले. गतिमान सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत नेमका कोणता पर्याय स्वीकारला जाईल हे अनिश्चित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारी मुख्य सचिव सौनिक यांनी शहरातील विविध प्रकल्पांविषयी बैठक घेतली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, मनपा आयुक्त मनिषा खत्री यांच्यासह महामेट्रोचे अधिकारी दृकश्राव्य प्रणालीव्दारे उपस्थित होते. नाशिकरोड रेल्वे स्थानकालगतच्या मनपाच्या सिन्नर फाटा येथील जागेत महारेल, मेट्रो निओ आणि सिटीलिंकचा बहुमजली मल्टीमॉडेल हब तयार करण्याचे प्रस्तावित आहे. या कामाला गती देण्याची सूचनाही बैठकीत करण्यात आली.

२०१९ मध्ये शहरात मेट्रो निओची घोषणा झाली होती. त्या अंतर्गत गंगापूर-नाशिकरोड आणि गंगापूर-मुंबईनाका या दरम्यान उड्डाण पुलासारख्या मार्गिका तयार करण्याचे प्रस्तावित होते. इतर भागातील नागरिकांना सेवेचा लाभ घेता यावा म्हणून अन्य दोन पुरवठा मार्गांवर इलेक्ट्रिक बसची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. मेट्रो निओच्या प्रस्तावाचे पंतप्रधान कार्यालयातही सादरीकरण झाले आहे. नाशिकसाठी मेट्रो निओचा प्रकल्प योग्य ठरेल की मोनोरेल, हलक्या वजनाची रेल्वे वा अन्य पर्याय याविषयी केंद्र सरकारच्या संबंधित विभागाशी चर्चा करण्याची सूचना सौनिक यांनी केल्याचे सांगितले जाते.