लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला रावेरची जागा मिळण्याचे संकेत असून, माझ्यासह चार जण इच्छुक आहेत. पहिला क्रमांक आपलाच असल्यामुळे भाजपचा उमेदवार कुणीही असला, तरी पूर्ण ताकदीनिशी आम्हीच रावेरची जागा जिंकू, असा दावा पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केला. रावेर लोकसभेसाठी इच्छुकांची नावेही खडसे यांनी जाहीर केली. त्यांनी जळगाव लोकसभेची जागा मित्रपक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडण्यात आल्याचे संकेत असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार गट वेगळा झाल्यानंतर लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिल्यांदाच जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली. पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकांसाठी पदाधिकाऱ्यांकडे जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. निवडणुकीची तयारी वेगाने सुरू झाली असली, तर चिन्हाच्या संभ्रमामुळे फलक, ध्वज व इतर साहित्य छपाईसाठी उशीर होत आहे, असेही खडसे यांनी नमूद केले. रावेरच्या जागेसाठी यावलचे नगराध्यक्ष अतुल पाटील, प्राचार्य प्रा. एस. एस राणे, रमेश पाटील यांच्यासह भुसावळ येथील जाममोहल्ल्यात राहणारे ठेकेदार व नगरसेवक इच्छुक आहेत, असेही ते म्हणाले.

आणखी वाचा-महायुतीच्या जागा वाटपाआधी नाशिकचा उमेदवार कसा जाहीर झाला?

खडसे हे भाजपच्या वाटेवर असलेल्या चर्चेवरही त्यांनी भाष्य केले. भाजपमध्ये येण्यास नाथाभाऊ धडपडताहेत, नाथाभाऊंची भाजपमध्ये जाण्याची इच्छा आहे, अशा फक्त वल्गना सुरू आहेत. मला जायचे असेल तर यांच्या परवानगीची गरज नाही, असा टोला खडसेंनी मंत्री गिरीश महाजनांना हाणला. पक्षाच्या तत्त्वाशी मतभेद असू शकतात. मात्र, व्यक्तिभेद नसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथसिंह, विनोद तावडे, जे. पी. नड्डा यांच्याशीही भेटी होत असायच्या. भाजपच्या खासदार रक्षा खडसे या माझ्या कुटुंबातील सदस्या आहेत. त्यामुळे त्यांच्याशी भेटीगाठी होणे स्वाभाविक आहे. मी माझ्या पक्षाशी एकनिष्ठ आहे आणि रक्षा खडसे यादेखील त्यांच्या पक्षाशी एकनिष्ठ आहेत, असे नमूद करीत खडसेंनी भाजपप्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिला.