नाशिक : मद्य विक्रीसाठी परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखवत दुसऱ्या जिल्ह्यातील १० पेक्षा अधिक संशयितांनी येवला येथील पैठणी व्यावसायिकास एक कोटीहून अधिक रुपयांना फसविले. या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येवला येथील पैठणी व्यावसायिक अनिल पाटोळे यांचा संशयित शिवलिंगप्पा पाटील, त्याची पत्नी प्रमिला, मुलगा रविकांत, मुलगी धनेश्वरी, जावई मल्लिकार्जुन पाटणे, मुलगी विजयलक्ष्मी होडगे, शिवराज होडगे (रा. सोलापूर), राजेंद्र वाघ, अक्षय भोसले तसेच अन्य तीन जणांनी पाटोळे यांचा विश्वास संपादन केला. शासकीय कार्यालयाची खोटी कागदपत्रे तयार करुन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मोठे अधिकारी असल्याची त्यांनी बतावणी केली.
हेही वाचा…पतंगबाजीत सारेच दंग, पोलिसांचे नायलाॅन मांजावर लक्ष
दारू आणि वाइन विक्रीचा परवाना काढून देतो, असे सांगून पाटोळे यांच्याकडून रोख तसेच आभासी पध्दतीने एक कोटी, ८१ लाख, २३ हजार १४१ रुपये उकळले. परंतु, या प्रकारास दीड वर्ष उलटूनही संशयितांकडून पुढे कोणतीच कार्यवाही न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटोळे यांनी सोमवारी येवला शहर पोलीस ठाण्यात संशयितांविरूध्द धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक नसल्याचे तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.