नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी जिल्ह्यातील ४८०० केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान केंद्र अधिकारी आणि इतर मतदान अधिकारी अशा एकूण ३० हजार ५३७ जणांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यातील नाशिक व दिंडोरी लोकसभेच्या १२ विधानसभा मतदारसंघात ३८३२ मतदान केंद्र येतात. उर्वरित तीन विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभेत समाविष्ट आहेत. दिंडोरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक २६३७ तर, देवळाली विधानसभा मतदार संघात सर्वात कमी १६०२ अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीच्या तयारीला यंत्रणेने वेग दिला आहे. विविध कामात यंत्रणेला मोठे मनुष्यबळ लागणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्रांवर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान केंद्र अधिकारी (क्रमांक एक) आणि इतर मतदान अधिकारी अशी नियुक्ती करण्यात येणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात १९२२, दिंडोरी लोकसभा मतदारसंघात १९१० मतदान केंद्र आहेत.

हेही वाचा…केबीसी घोटाळ्यातील सूत्रधारांची ८४ कोटींची मालमत्ता ‘ईडी’ने का जप्त केली ?

धुळे लोकसभा मतदारसंघात मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण मतदारसंघातील ९६८ मतदार केंद्र समाविष्ट होतात. विधानसभा मतदारसंघनिहाय ही नियुक्ती करण्यात येणार आहे. यात जिल्ह्यात मतदान केंद्र अध्यक्ष म्हणून ६७७०, मतदान केद्र अधिकारी (क्रमांक एक) ६८२० आणि इतर मतदान अधिकारी म्हणून १६ हजार ९४७ अशी एकूण ३० हजार ५३७ जणांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी दिली.

हेही वाचा…नाशिक : मुसळगाव औद्योगिक वसाहतीत एटीएम फोडणाऱ्यांना अटक

मतदारसंघनिहाय संख्या कशी…

मतदान केंद्राध्यक्ष, मतदान केंद्र अधिकारी आणि इतर मतदान अधिकारी असे मिळून मतदान केंद्रावर अधिकारी नियुक्त होतील. त्यांचा एकत्रित विचार करता सिन्नर विधानसभा मतदारसंघात १९६०, नाशिक पूर्व २५२५, नाशिक मध्य २५४८, नाशिक पश्चिम २२६२, देवळाली १६०२, इगतपुरी २१३५, नांदगाव १८११, कळवण १९७०, चांदवड २०९८, येवला १६४८, दिंडोरी २६३७, मालेगाव मध्य १९३८, मालेगाव बाह्य १८४३, बागलाण विधानसभा मतदारसंघात १६७६ असे अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Over 30 thousand officials will appoint for lok sabha elections in nashik district psg