नाशिक : परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्येची चौकशी करण्यासाठी परभणी ते मुंबई मंत्रालय अशी पदयात्रा काढण्यात आली असून शनिवारी पदयात्रा नाशिकमध्ये दाखल झाली. माकपसह अन्य समविचारी पक्ष, संघटनांच्या वतीने या पदयात्रेला पाठिंबा दर्शविण्यासाठी अचानक रास्ता रोको केल्याने द्वारका परिसरात वाहतूक कोंडी झाली.
सूर्यवंशी आणि देशमुख प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी परभणीहून पदयात्रा निघाली आहे. शुक्रवारी पदयात्रा नाशिकमध्ये आल्यावर माकपसह अन्य समविचारी संघटनांचे कार्यकर्ते पदयात्रेत सामील झाले. कुठलीही पूर्वसूचना न देता द्वारका येथे रास्ता रोको करण्यात आला. यावेळी राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे बराच वेळ वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी समजावल्यावर पदयात्रा पुढे निघाली. दरम्यान, वाहतूक कोंडीमुळे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिला.