जळगाव: शहरात कमी मुदतीचा व्हिसा वापरून राहणाऱ्या सात पाकिस्तानी नागरिकांची पुन्हा आपल्या देशात जाण्याची इच्छा नाही. त्यामुळे त्यांनी यापूर्वीच दीर्घ मुदतीच्या व्हिसासाठी अर्ज केला आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने जळगावच्या पोलीस प्रशासनाने संबंधितांना खबरदारीचा उपाय म्हणून कायदेशीर नोटीस बजावली आहे.

पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने कमी मुदतीच्या व्हिसावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जळगावच्या पोलीस प्रशासनाने केलेल्या कार्यवाही संदर्भात अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी माहिती दिली.

नोटीस मिळाल्यानंतर संबंधित पाकिस्तानी महिला आणि पुरूष हे पोलीस अधीक्षक कार्यालयात आले होते. त्यांनी आम्हाला पाकिस्तानात परत जायचे नसल्याचे सांगत यापूर्वीच दीर्घ मुदतीच्या व्हिसासाठी अर्ज केल्याची माहिती दिली. त्यासंदर्भात पुढे काय कार्यवाही झाली, त्याचा आढावा अधीक्षकांनी लगेच घेतला. त्यांचा कमी मुदतीचा व्हिसा दीर्घ मुदतीत रूपांतरीत झालेला असल्यास किंवा तो प्रक्रियेत असल्यास, संबंधितांना लगेच भारत देश सोडावा लागणार नसल्याचे डॉ. रेड्डी यांनी स्पष्ट केले.

जळगाव जिल्ह्यात सुमारे ४०५ पाकिस्तानी नागरिक आले असून, त्यांची चौकशी केली असता ३२७ जणांकडे कमी मुदतीचा पर्यटक व्हिसा असल्याचे आढळले. मात्र, संबंधितांनी दीर्घ मुदतीच्या व्हिसासाठी यापूर्वीच पोलीस प्रशासनाकडे अर्ज केला असून, त्यांना तो मिळाला आहे. त्यामुळे ते सर्वजण आता कायदेशीररित्या जळगाव शहरात वास्तव्य करत आहेत. याशिवाय काही पाकिस्तानी नागरिकांनी भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठीही अर्ज केले आहेत. त्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी दिली.