लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव: जामनेर तालुक्यात बनावट खतामुळे शेकडो एकर क्षेत्रात लागवड केलेल्या कपाशीची वाढ खुंटल्याच्या २२७ शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारी गुरुवारी सायंकाळी अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या. याबाबत शुक्रवारी कृषी विभागाच्या पथकाने थेट शेतबांधावर जात पीकपाहणी केली. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी तत्काळ तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना सूचना देऊन संबंधित शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्यास सूचित केले आहे.
जामनेर तालुक्यात अनेक दुकानांत सरदार कंपनीचे बनावट रासायनिक खत विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील २२५ शेतकर्यांच्या यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. तालुक्यातील मोयखेडा, ढालसिंगी, तोंडापूर, खांडवा, मांडवा, भारुडखेडा, कुंभारी यांसह परिसरातील शेतकर्यांनी सुपर फॉस्फेट व सिंगल सरदार अॅग्रो फर्टिलायझर केमिकल कंपनीचे खत ठिबक संचावरील कपाशी व मिरची पिकाला टाकले. त्यामुळे पिके खराब झाली आहेत. तालुक्यातील सुमारे बाराशे ते तेराशे एकर क्षेत्रातील पिकांचे लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
हेही वाचा… रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्यास कोठडी
मात्र, पंचनामे केल्यानंतर किती एकर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले, जामनेर तालुक्यात कृषी अधिकाऱ्यांच्या पथकाने थेट शेतबांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. तज्ज्ञांकडून खतांची तपासणी केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे, असे तालुका कृषी अधिकारी चोपडे यांनी सांगितले. दरम्यान, शेतकर्यांनी वापरलेल्या रासायनिक खतांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याच्या सूचना ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केल्या आहेत.