नाशिक – शहरातील कीर्ती कलामंदिराच्या वतीने ३० व्या नटराज पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सवाचे आयोजन २६ ते २८ ऑगस्ट या कालावधीत सायंकाळी सहा वाजता परशुराम सायखेडकर नाट्यगृह, औरंगाबादकर सभागृह आणि महाकवी कालिदास कला मंदिर येथे करण्यात आले आहे. पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सव म्हणजे अभिजात शास्त्रीय नृत्याच्या समृद्ध परंपरेची जपणूक करतानाच प्रयोगशीलता आणि नाविन्याचा ध्यास होय. यंदाही अशीच अनुभूती नाशिककरांना मिळणार आहे.
महोत्सवाचा शुभारंभ सावर्जनिक वाचनालय नाशिकच्या परशुराम साईखेडकर नाट्यमंदिरात अविनय मुखर्जी यांचे एकल नृत्य आणि श्रुती देवधर, मृदुला तारे यांच्या युगल नृत्याने होणार आहे. अविनव हे नृत्यांगना आणि गुरू गीतांजली लाल यांचे शिष्य आहेत. जयपूर घराण्याच्या पारंपरिक रचनांचा नृत्याविष्कार नाशिककरांना अनुभवता येणार आहे. महोत्सवाच्या प्रथम सत्राचा प्रारंभ कीर्ती कलामंदिराच्या ज्येष्ठ नृत्यांगना आदिती पानसे त्यांच्या शिष्या श्रुती देवधर आणि मृदुला तारे यांच्या युगल नृत्याने होणार आहे. दोघींनी अखिल भारतीय गांधर्व मंडळाची विशारद पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली असून रामटेक विद्यापीठातून फाईन आर्टमध्ये पदव्युत्तर पदवी मिळविली आहे.
महोत्सवात २७ रोजी मु. शं. औरंगाबादकर सभागृहात ‘इटरनल बॉंड’ हा विदुषी गुरू रोहिणी भाटे यांच्या नृत्य प्रवासाचा दुर्मिळ आणि असामान्य माहितीपट त्यांच्या शिष्या नीलिमा आध्ये यांच्या प्रात्यक्षिकासह बघता येईल. शास्त्रीय नृत्य म्हणजे केवळ मनोरंजन नाही तर तो एक विचार आहे. त्याला परंपरा आहे. तरीही सहज उत्स्फूर्ततेतून ही कला सजली आहे. गुरू-शिष्याच्या अतूट नात्यांना उलगडणारा ‘इटरनल बॉड’ महोत्सवाचे आकर्षण आहे.
हेही वाचा – बंदुकीच्या धाकाने धुळ्यात दरोडा; दागिन्यांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास
महोत्सवाचा समारोप २८ रोजी महाकवी कालिदास कलामंदिर येथे डॉ. टीना तांबे यांचे एकल नृत्य आणि गुरू रेखा नाडगौडा यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या ‘द व्हायब्रन्स’ या नृत्य संरचनेने होणार आहे. डॉ. तांबे यांनी अनेक पदव्या संपादन केल्या आहेत. द व्हायर्बनट अर्थात जल्लोष चैतन्याचा रेखा नाडगौडा यांच्या संकल्पनेतून साकारणारी ही नृत्याकृती कीर्ती कला मंदिराच्या यशस्वी नृत्यांगना सादर करणार आहेत. या संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन पियू आरोळे करणार असून साथसंगत तबल्यावर चारुदत्त फडके, प्रदीप लवाटे, बल्लाळ चव्हाण, सत्यप्रकाश मिश्रा. गायन रवींद्र साठे, त्यागराज खाडिलकर, श्रीरंग टेंबे, नागेश आडगावकर, विनय रामदासन, आशिष रानडे, मृण्मयी पाठक आणि ईश्वरी दसककर सतारवर अनिरुद्ध जोशी, बासरीवर सुनील अवचट हार्मोनियमवर चिन्मय कोल्हटकर, श्रीरंग टेंबे, ईश्वरी दसककर करणार आहेत. रसिकांनी, नृत्य अभ्यासकांनी महोत्सवाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.