नाशिक : ‘नाशिकचे पंडित जवाहरलाल नेहरू वन उद्यान अर्थात बॉटनिकल गार्डन प्रकल्प खूप चांगला आणि नाविन्यपूर्ण आहे. हा प्रकल्प पाहून प्रभावित झालो, अशी भावना ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी काही वर्षांपूर्वी या प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर व्यक्त केली होती. नाशिकचे वैभव होऊ पाहणाऱ्या या प्रकल्पाकडे नंतर महापालिकेने दुर्लक्ष केल्याने सद्यस्थितीत हे वनोद्यान बंद आहे.

नाशिक महापालिकेत २०१२-१७ या कालावधीत नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता होती. याच काळात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टाटा ट्रस्टच्या सामाजिक दायित्व निधीतून या उद्यानाची निर्मिती करण्यात आली. राज ठाकरे यांच्या विनंतीला मान देऊन जानेवारी २०१७ मध्ये उद्योगपती रतन टाटा हे नाशिकला आले होते. सकाळी ओझर येथील विमानतळावर त्यांचे आगमन झाले. त्यानंतर ते या वनोद्यानात राज ठाकरे यांच्यासह पोहचले. अर्धा तास टाटा यांनी या संपूर्ण प्रकल्पाचे अवलोकन केले होते.

हे ही वाचा…शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणे नाशिकसाठी गौरवास्पद – पालकमंत्री दादा भुसे यांची भावना

नंतर उद्योजकांशी संवाद साधला होता. यावेळी निमा, आयमा, बिल्डर असोसिएशन, उद्योजक, मनसेचे अविनाश अभ्यंकर, तत्कालीन महापौर अशोक मुर्तडक, डॉ. प्रदीप पवार, सलीम शेख उपस्थित होते. यावेळी उद्योजकांशी त्यांनी काही वेळ संवाद साधला होता. या वनोद्यानाच्या निमित्ताने टाटा यांनी नाशिकला भेट दिली होती. नाशिक महापालिकेत मनसेच्या सत्ताकाळात राज ठाकरे यांनी देशातील विविध अग्रणी उद्योग समूहांकडून सामाजिक दायित्व निधीतून गोदा पार्क, चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क, बाळासाहेब ठाकरे ऐतिहासिक शस्त्रसंग्रहालय, नेहरू वनोद्यान असे विविध प्रकल्प सुरु केले होते.

वनोद्यान प्रकल्प काय होता ?

नाशिकमधील पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यानाचे प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. या उद्यानातून पर्यावरणपूरक संदेश मिळावा, या हेतूने ‘कथा अरण्याची’ या साउंड व लाईट शोची सुरुवात करण्यात आली होती. यामुळे हळूहळू नाशिककरांनी व विविध ठिकाणाहून आलेल्या पर्यटकांनी या वनौषधी उद्यानाला भेटी देण्यास सुरुवात केली होती. मराठी चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांनीदेखील या उद्यानास भेट दिली होती.

हे ही वाचा…टपाल दिन फेरीत ‘हरकारा’, ‘ब्रिटिशकालीन पोस्टमन’ आकर्षण

सद्यस्थिती काय ?

उद्योगपती रतन टाटा यांनी भेट देऊन पाहणी केलेले नेहरू वनोद्यान सध्या बंद आहे. या प्रकल्पाची स्थिती फारशी चांगली नाही. टाटा ट्रस्टने उभारलेल्या या प्रकल्पाची महापालिकेने पुढील काळात योग्य प्रकारे देखभाल, दुरुस्ती केली नाही. ध्वनि व प्रकाशाची व्यवस्था बंद पडली. राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून वनोद्यानाची संकल्पना प्रत्यक्षात आली. नाशिककरांसह पर्यटकांचा त्यास अभूतपूर्व प्रतिसाद मिळत होता. मात्र, मनपा प्रशासनाच्या ताब्यात हा प्रकल्प गेल्यानंतर त्याची दुरवस्था झाली. वारंवार पाठपुरावा करूनही महापालिकेने लक्ष दिले नाही, असा आरोप मनसेचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी केला आहे.