प्रसिध्द चित्रकार पंडित खैरनार यांच्या चित्रांचे प्रदर्शन १५ ते १८ डिसेंबर या कालावधीत गंगापूर रस्त्यावरील कुसुमाग्रज स्मारकात होणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी पाच वाजता वास्तुविशारद संजय पाटील यांच्या हस्ते तर विजया अहिरे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
शालेय जीवनातील कलाशिक्षक दिवंगत के. एम. अहिरे यांना अभिवादन म्हणून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रकार पंडित खैरनार हे गेल्या पंचवीस वर्षांपासून कलाजगतात कार्यरत आहेत. मुंबईला प्रदीर्घ काळ वास्तव्य करणारे खैरनार अलिकडेच नाशिकला स्थायीक झाले. जहांगीर आर्ट गॅलरी व इतर कलादालनात त्यांची दहा चित्र प्रदर्शने झाली आहेत. तसेच अनेक नामांकीत चित्रकारांसोबत बडोदा, दिल्ली, कोलकत्ता, बंगळुरू, भोपाळ या ठिकाणी प्रसिध्द समूह चित्रप्रदर्शन झाली आहेत. त्यांच्या चित्रांना कलारसिक व जाणकारांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. अपूर्व चित्रशैलीतून आकार व रुपाचा वेध हे त्यांच्या चित्रांचे वैशिष्टय़ आहे. मनातील जाणिवांचे द्वंद्व आणि शोध हे त्यांचे चित्रसूत्र आहे.
बिजांच्या अंकुरणाचा क्षण म्हणजे सृजनाची अवस्था टिपणे व निर्मिती प्रक्रियेला दृश्यात्मकतेत परावर्तीत करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. रंगमाध्यम आणि विचारांची प्रक्रिया त्यांना महत्वाची वाटते. भवताल घडणारे विविध बदल व चिंतन या संयोगातून रचनात्मक आणि मूलभूत विचारसूत्र त्यांच्या चित्रातून जाणवते. प्रदर्शनास कलारसिकांनी भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Story img Loader