मालेगाव : निवासी जागेचे संरक्षण मिळावे म्हणून छायाचित्र ओळखपत्र (फोटोपास) प्राप्त करण्यासाठी झोपडपट्टीधारकांकडून महापालिकेला सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या तीन गोण्यांमध्ये भरुन ठेवलेल्या फायली रस्त्यावर आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
काही जागरूक नागरिकांना दुपारी येथील बुनकर बाजाराजवळ असलेल्या रस्त्यावर महापालिकेची कागदपत्रे भरलेल्या गोण्या निदर्शनास आल्या. त्यांनी ही बाब सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे यांना कळवली. बोरसे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिल्यानंतर संकीर्ण कर विभागाचे अधीक्षक रमाकांत धामणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करत कागदपत्रे भरलेल्या तिन्ही गोण्या ताब्यात घेतल्या. तपासणीअंती शहरातील झोपडपट्टी वासियांना संरक्षण देण्यासाठी महापालिकेकडून जे छायाचित्र असणारे ओळखपत्र (फोटोपास) देण्यात येत होते, त्यासाठी झोपडपट्टीवासियांनी महापालिकेकडे सादर केलेल्या प्रस्तावांच्या या फायली असल्याचे उघड झाले. या फायली २००३ मध्ये दाखल केल्याचे आणि त्यावेळी नामंजूर करण्यात आल्या होत्या, असेही आढळून आले आहे.
हेही वाचा… काळ्या बाजारात विक्रीपूर्वीच रेशनचा तांदूळ हस्तगत, जळगाव जिल्ह्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा
हेही वाचा… जळगाव मनपा तिजोरीत ऑनलाइन करभरणामुळे तीन वर्षांत ३९ कोटी जमा, आता क्यूआर कोड लावणार
झोपडपट्टीवासियांना फोटोपास देण्याचे काम नगर विकास विभागाच्या अखत्यारीत येत होते. पूर्वी शिवाजी टाऊन हॉलच्या इमारतीत या विभागाचे काम चालत होते. आता मोडकळीस आलेल्या या इमारतीमधील एका कपाटात कागदपत्रांच्या या फायली गोण्यांमध्ये भरून ठेवण्यात आल्या होत्या. तेथून कुणीतरी चोरी करून रद्दीत विकण्याच्या उद्देशाने या फायली बाहेर नेल्या असण्याची शक्यता आहे. या फायली सांभाळण्याची जबाबदारी कुणाची होती आणि त्या बाहेर कशा गेल्या, याची चौकशी करण्याचे आदेश आयुक्त जाधव यांनी दिले आहेत. दरम्यान,सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या शिष्टमंडळाने या संदर्भात आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.