नाशिक – जिल्हा शासकीय रुग्णालयातील बाळ बदल प्रकरणात चौकशी समितीच्या अहवालानुसार रुग्णालय व्यवस्थापनाने दोषींवर कारवाई केल्यानंतर शुक्रवारी नवजात शिशुच्या पालकांनी बाळाचा स्वीकार केला. नांदुरनाका येथील रितिका पवार या जिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झाल्या होत्या. प्रसुतीनंतर बाळाची नोंद पुरूष जातीचे अर्भक करण्यात आल्याचे पालकांचे म्हणणे आहे. बाळाला उपचारासाठी रुग्णालयातील बाळांसाठी असलेल्या कक्षात नेण्यात आले. त्यानंतरही बाळाच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा >>> उदंड इच्छुकांमुळे नाशिकमध्ये भाजप फुटीच्या उंबरठ्यावर; गणेश गिते तुतारी हाती घेण्याची चिन्हे

त्यावेळी नातेवाईक बाळाचे डायपर बदलत असताना बाळ मुलगा नसून मुलगी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात येऊन गोंधळ घातला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांनी संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी समिती नेमली. या समितीने बाळाच्या जन्माच्या वेळी करण्यात आलेल्या नोंदी तसेच सीसीटीव्ही चित्रणासह अन्य कागदपत्रे ताब्यात घेतली. बुधवारी रात्री उशीराने समितीचा अहवाल प्राप्त झाला. या अहवालानुसार आठहून अधिक दोषींवर कारवाई करण्यात आली.

हेही वाचा >>> सुरगाण्यात दोन बिबट्यांच्या वर्चस्ववाद लढाईत एकाचा मृत्यू

शुक्रवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे आणि बाळाचे पालक यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत या वादावर पडदा पडल्याचे सांगितले. डॉ. शिंदे यांनी यासंदर्भात माहिती दिली. नवजात बाळ हे पवार दाम्पत्याचेच असून ती मुलगी आहे. सीसीटीव्ही चित्रण, बाळ झाल्यावरचे तिचे छायाचित्र आणि नंतरचे छायाचित्र, बाळाला जन्मत: असणारा दोष, अन्य अहवाल याची खातरजमा झाल्यानंतर पालकांनी बाळाचा स्वीकार केला. बाळावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती नाजूक आहे. याविषयी तेथील डॉक्टरांची प्रत्यक्ष भेट घेत चर्चा केली आहे. तसेच, नातेवाईकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले.

मुलीचे वडील महेश पवार यांनी, आम्हांला मुलगा झाल्याचे सांगण्यात आल्यावर त्यानंतर झालेला गोंधळ सर्वांना माहिती असल्याचे नमूद केले. याविषयी समिती नेमून दोषींवर कारवाई झाल्याने आता आमच्याही शंकांचे समाधान झाल्याने आमची मुलगी आम्ही घरी घेऊन जात आहोत, असे त्यांनी सांगितले.