पंचवटीतील सेवाकुंज चौकात बसच्या धडकेत तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याचे संतप्त पडसाद शुक्रवारी सकाळी पुन्हा उमटले. अपघात घडूनही पोलीस, महापालिका, शिक्षण संस्थेने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत शेकडो पालकांनी सेवाकुंज चौकात रास्ता रोको करत निमाणी बसस्थानक-काटय़ा मारुती चौक दरम्यानच्या मार्गावरील वाहतूक तीन ते चार तास बंद पाडली. दुर्घटनेनंतरही सकाळी वाहतूक पोलीस तैनात नव्हता. असुरक्षित वाहतुकीच्या प्रश्नावर नंतर चर्चा करू असे संस्थेकडून सांगितले गेले. यामुळे संतापलेल्या पालकांनी मुख्य रस्त्यावर धाव घेऊन वाहतूक बंद पाडली. बराच वेळ समजूत काढल्यानंतर आणि या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी पालिका आयुक्तांसमवेत दुपारी बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले. अचानक झालेल्या या घडामोडींमुळे पंचवटीतील आसपासच्या भागातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली.
आर. पी. विद्यालयात शिशू वर्गात शिक्षण घेणारा रोनित चौहान या तीन वर्षीय विद्यार्थ्यांचा बुधवारी बसच्या धडकेत मृत्यू झाला तर त्याची आजी अपघातात गंभीर जखमी झाली. त्यानंतर संतप्त पालकांनी बसची तोडफोड केली होती. या दुर्घटनेनंतर चौकात वाहतूक पोलिसाची नेमणूक केली. रोनितच्या निधनामुळे गुरूवारी शाळेला सुटी देण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास बहुसंख्य पालक पाल्यांना सोडविण्यासाठी आणि रस्त्यावरील स्थितीचे अवलोकन करण्यासाठी आले होते. त्यावेळी सेवाकुंज चौकात वाहतूक पोलीस नव्हता. काहींनी मुख्याध्यापकांशी संपर्क साधून विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून चर्चा करावयाची असल्याचे सांगितले. तथापि, संबंधितांकडून अकरानंतर चर्चा करू असे सांगण्यात आले. या एकंदर कार्यशैलीमुळे संतप्त पालकांनी चौकात धाव घेऊन रास्ता रोको करण्यास सुरूवात केली. अनेकदा अपघात घडुनही पोलीस व पालिका लक्ष देण्यास तयार नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी निमाणी बसस्थानक ते काटय़ा मारुती चौक या दरम्यान उड्डाणपूल अथवा चौकात भुयारी मार्गाची मागणी कित्येक वर्षांपासून केली जात आहे. तथापि, त्याकडे कानाडोळा केला जात असल्याने अपघात घडत आहेत. त्यात पुन्हा हकनाक निष्पाप मुलाचा जीव गेला. आज चौहान कुटुंबावर कोसळलेला दु:खाचा डोंगर उद्या कोणत्याही पालकावर कोसळू शकतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. वाहतूक पोलिसाची नियुक्ती करूनही तो उपस्थित नाही. शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेत संस्था कर्मचाऱ्यांची नियुक्ती करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
शेकडो पालक रस्त्यावर उतरल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. पंचवटी पोलिसांनी धाव घेऊन पालकांना समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. कोणी मागे हटण्याच्या तयारीत नसल्याने अखेर निमाणी बसस्थानकावरून पुढे जाणारी आणि काटय़ा मारुतीकडून येणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. दरम्यानच्या काळात पोलिसांचा मोठा फौजफाटा शीघ्र कृती दलासह दाखल झाला. पोलीस उपायुक्त एन. अंबिका यांनी पालकांचे म्हणणे जाणून घेतले. उपमहापौर गुरूमित बग्गा यांनी पालकांची समजूत काढली. या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी दुपारी पालिका आयुक्तांसोबत बैठक निश्चित करण्यात आली.

तातडीच्या उपायांकडे लक्ष : निमाणी बसस्थानक-काटय़ा मारुती चौक या दरम्यानच्या रस्त्यावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने काय उपाययोजना करता येतील, यावर भर दिला जात आहे. सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे, गतिरोधकांची संख्या वाढवून वाहने वेगात मार्गक्रमण करणार नाही याची दक्षता घेण्यासारखे उपाय लगेच करता येईल. उड्डाण पूल अथवा भुयारी मार्ग करण्याच्या पालकांच्या मागणीबाबत पालिका प्रशासनाशी चर्चा केली जाईल. या संदर्भात सकारात्मक निर्णय झाला तरी त्यास विलंब लागू शकतो. यामुळे आधी तातडीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जाईल. – गुरूमित बग्गा (उपमहापौर)

Story img Loader