लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : पतंगोत्सवात नायलॉन मांजाचा वापर रोखण्यासाठी प्रतिबंधित मांजाची विक्री करणाऱ्यांवर हद्दपारीची कारवाई केल्यानंतर शहर पोलिसांनी आता या मांजाने पतंग उडवणाऱ्या मुलांसह त्यांना नायलॉन मांजा खरेदी करुन देणाऱ्या पालकांवर थेट कारवाईचे सत्र सुरु केले आहे. शहरात सर्वत्र नायलॉन मांजाने पतंग उडविणाऱ्यांची छाननी सुरू असून अनेक मुलांसह पालकांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. मकर संक्रातीच्या दिवशी ही कारवाई अधिक व्यापक स्तरावर करण्याची तयारी यंत्रणेने केली आहे.
पतंगोत्सवातील नायलॉन मांजाचा वापर वाहनधारकांसह पशू-पक्ष्यांसाठी धोकादायक ठरत आहे. या मांजामुळे शहर आणि ग्रामीण भागात अनेक वाहनधारक जखमी झाले आहेत. पर्यावरणास हानीकारक ठरणाऱ्या नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक व वापरास पोलिसांनी बंदी घातलेली आहे. अशा स्थितीत छुप्या पद्धतीने त्याची विक्री करणाऱ्या अनेक विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. प्रतिबंधित मांजाची विक्री करणाऱ्यांवर थेट हद्दपारीच्या कारवाईचे निर्देश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले होते. त्यानुसार आतापर्यंत सुमारे ७५ विक्रेत्यांवर हद्दपारीची कारवाई झाली. नायलॉन मांजाची विक्री रोखण्यासाठी चाललेल्या कारवाईची व्याप्ती आता वापरकर्ते आणि मुलांना हा मांजा खरेदी करून देणाऱ्या पालकांपर्यंत विस्तारण्यात आली आहे.
आणखी वाचा-नाशिकमध्ये उड्डाणपुलावरील अपघातात पाच जण मृत्युमुखी, १३ जखमी
पतंग उडविण्यासाठी प्रतिबंधित नायलॉन मांजा बाळगताना आढळलेल्या अल्पवयीन मुलांसह त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्याचे सत्र आरंभण्यात आले. त्या अंतर्गत सात ते आठ पालकांविरोधात पंचवटी, आडगाव, उत्तमनगर, अंबड, देवळाली कॅम्प या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अनेक युवकांवर गुन्हे
या कारवाई दरम्यान नायलॉन मांजाने पतंग उडविल्या प्रकरणी हर्षद बोरुडे (२३, पेठरोड), प्रेम ढोंगे (२३, एकतानगर, बोरगड), तन्वीर शहा (२५, नानावली, जुने नाशिक), शहबाद शाह (२६, नानावली दर्ग्यासमोर), सुनील मदरकी (३१, कस्तुरबानगर, होलाराम कॉलनी), तौकीर शेख (२४, अशोका मार्ग), प्रथमेश दाभाडे (२२, पवननगर), मनोज शिंदे (२५, पाथर्डी फाटा), हर्ष पैठणकर (२३) आणि कुणाल पवार (२६, दोघेही वावरेनगर), दर्शन चौधरी (१९, शुभम पार्क, अंबड), अमोल कोळे (२५, आम्रपाली झोपडपट्टी, जेलरोड), अनिकेत पवार (२४, देवळाली कॅम्प), आकाश पिंपळे (२१, देवळाली कॅम्प), ज्ञानेश्वर साबळे (१९, इंदिरानगर) यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधितांकडून नायलॉन मांजा, फिरकी आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे.