नाशिक – पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करणारी श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी सोमवारी सकाळी सिन्नरपर्यंत पोहचली. नाशिकजवळील पळसे येथील मुक्कामानंतर पालखी सिन्नरच्या दिशेने निघाली असता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी सात किलोमीटर पायी चालत दिंडीची अनुभूती घेतली.
नाशिकरोड येथून रविवारी संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी दिंडी दुपारच्या सुमारास मार्गस्थ झाली. पळसे गावात रात्री मुक्काम करून सोमवारी सिन्नरच्या दिशेने पालखी निघाल्यावर शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिंडीत प्रत्यक्ष सहभाग घेतला. कर्णिक यांनी डोक्यावर पांढरी टोपी, कपाळी गंध टिळा तर गळ्यात टाळ घेतले. उपायुक्त राऊत यांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन हरी नामाचा गजर करत पळसे गाव ते चिंचोली गाव असे सात किलोमीटर पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. वारकऱ्यांच्या भजनाला कर्णिक हे प्रतिसाद देत होते. सहायक आयुक्त संदीप मिटके, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामदास शेळके यांसह अन्य अधिकारीही दिंडीत सहभागी झाले होते.