नंदुरबार : सुरतहून अयोध्येकडे जाणाऱ्या आस्था एक्स्प्रेसवर रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास नंदुरबार रेल्वे स्थानकाजवळ दगडफेक झाल्याची तक्रार काही प्रवाश्यांनी केली. दुसरीकडे, रेल्वे पोलीस दलाने तपासणी केली असता दगडफेकीचे निशाण आढळून आले नाही. पोलिसांनी अज्ञातांविरोधात तक्रार नोंदवून घेतली आहे.
नंदुरबार रेल्वे स्थानकापासून जवळपास एक किलोमीटरवर दगडफेक झाल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती. त्या परिसरात पोलिसांनी झाडाझडती घेतली. याठिकाणी पोलिसांना झाडाझुडपात झोपलेले दोन जण आढळून आले. यातील एक नांदेडचा रहिवासी असून तो मद्यपी होता. दुसरा मनोरुग्ण असून त्याला रेल्वे पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयातील मनोरुग्ण विभागात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा…जळगाव जिल्ह्यात कासवांची तस्करी करणारे तिघे वनविभागाच्या जाळ्यात
दरम्यान, कोणीही बोलण्यास तयार नसल्याने दगडफेक झालीच नसल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकारानंतर नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, शहर पोलीस ठाण्याचे राहुल पवार यांनी रेल्वे स्थानकात जावून संपूर्ण घटनेचा आढावा घेतला.