नाशिक : इगतपुरी रेल्वे स्थानकात गाडी थांबवून ठेवल्याच्या कारणावरून संतप्त प्रवाशांनी स्थानक प्रमुखाच्या कक्षात गोंधळ घातला. साडेतीन तासांहून अधिक काळ गाडी थांबवून ठेवल्याने प्रवाशांच्या संतोपाचा कडेलोट झाला. घाटातील दुरुस्ती काम व सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे गाड्यांना विलंब झाला.

लखनऊ लोकमान्य टिळक टर्मिनस वातानुकूलीत रेल्वेगाडी साडेतीन तास इगतपुरी स्थानकात उभी करून ठेवल्याने प्रवासी संतापले. मागून आलेल्या गाड्या सोडल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला. संतप्त प्रवाशांनी स्थानक प्रमुखाच्या कार्यालयात जाऊन गाडी तत्काळ सोडण्याची मागणी करत गोंधळ घातला. गाडी थांबवून ठेवण्याचे कोणतेही कारण प्रशासनाकडे नसल्याने प्रवासी संतप्त झाले होते. अखेर साडेतीन तासांनी गाडी इगतपुरी स्थानकातून रवाना करण्यात आली. नंतर स्थानकापुढे कसारा घाटात काही अंतरावर गाडी पुन्हा थांबविल्याने प्रवाशांच्या संतापात भर पडली.

इगतपुरी येथे रेल्वेचे कसारा घाटात अप व मध्य मार्गिकेत अचानक दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे काही काळ ब्लॉक घेण्यात आल्याने गाड्यांना सोडायला उशीर झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. अप लाइनवर गाडी उभी असताना पाठीमागून येणाऱ्या गाड्या मध्य मार्गिकेवरून वळविण्यात येऊन पुढे थांबविण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांना वाटले की, मागच्या गाड्या पुढे सोडल्या. त्यामुळे गोंधळ उडाला होता. काम पूर्ण झाल्यावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे गाड्यांना आणखी उशीर झाला. सिग्नल यंत्रणा दुरुस्त झाल्यानंतर व घाटातील काम संपल्यानंतर सायंकाळी साडेचार वाजेनंतर गाड्या मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या. घाटात गोंधळ होऊ नये म्हणून लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी पाहणी करत असल्याचे दिसून आले.

Story img Loader