नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या क्रांतिसूर्य महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक लोकार्पण सोहळ्यासाठी शनिवारी दुपारपासून महामार्ग बसस्थानक बंद केल्यामुळे भर पावसात प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागले. या स्थानकातून सुटणाऱ्या बसेस ऐनवेळी ठक्कर बाजार व मेळा स्थानकातून सोडल्या गेल्याने प्रवाशांना दीड, दोन किलोमीटर अंतर धावपळ करावी लागली. कार्यक्रमास बराच विलंब झाल्यामुळे सायंकाळ उशिरापर्यंत परिस्थितीत बदल झाला नाही.
नाशिकमधील मुंबईनाका परिसरात उभारण्यात आलेल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती कांस्य धातूच्या शिल्पाचा लोकार्पण सोहळा शनिवारी दुपारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री फडणवीस, पवार, मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. हा अतिशय वर्दळीचा परिसर आहे. या कार्यक्रमासाठी महामार्ग बस स्थानकातील मोकळ्या जागेत भव्य जलरोधक तंबू उभारण्यात आले. याच स्थानकातून मुंबई, ठाणे, बोरिवली, कसारा, अहमदनगर, शिर्डी, सोलापूर, अक्कलकोट, बारामती आदी ठिकाणी बस सोडल्या जातात. उपरोक्त कार्यक्रमासाठी दुपारी एक वाजेपासून स्थानकातील बससेवा बंद करण्यात आली. येथील बसेस ठक्कर बाजार व मेळा स्थानकातून सोडण्याचे नियोजन करण्यात आले.
हे ही वाचा…नाशिक विभागातीलं १६ मतदारसंघ महायुतीसाठी ‘नाजूक’ ; भाजपचा अभ्यासातील निष्कर्ष
या बदलाची कुणालाही कल्पना नसल्याने परगावी जाण्यास निघालेले शेकडो प्रवासी, पर्यटक व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. पावसात या ठिकाणी येणाऱ्यांना ठक्कर बाजार आणि मेळा स्थानकात जाण्यास सांगितले जात होते. महामार्ग स्थानकातून दुसरे स्थानक दीड ते दोन किलोमीटरवर आहे. ये-जा करण्यात प्रवाशांना नाहक भुर्दंड सोसावा लागला. काही प्रवासी अर्धा ते पाऊण तास बसची प्रतिक्षा करीत बसले होते. महामार्ग स्थानकातील बसेस ठक्कर बाजार व मेळा स्थानकातून सोडण्याचे नियोजन केल्याने त्या ठिकाणी गोंधळाची स्थिती होती. आपली बस शोधण्यासाठी प्रवाशांना बसचा फलक पाहण्यासाठी धावपळ करावी लागली. कार्यक्रमास विलंब झाल्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत महामार्ग स्थानक बंदच राहिले.
महामार्ग स्थानकात ज्या भागात मंडपाची उभारणी करण्यात आली, त्या जागेचा वापर मुक्कामी बस थांबण्यासाठी केला जातो. या सोहळ्यामुळे मोठ्या संख्येने असणाऱ्या बसेस अन्यत्र नेवून ठेवण्याची कसरत एसटी महामंडळाला करावी लागली. या संदर्भात राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
हे ही वाचा…नाशिकमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज विविध कार्यक्रम
ऐनवेळी २०० बस सुटण्याचे स्थानक बदलले
लोकार्पण सोहळ्यामुळे दुपारी एकनंतर महामार्ग बसस्थानक बंद करण्यात आले. बसच्या आवारात राजकीय पक्षांचे नेते व पदाधिकाऱ्यांची वाहने उभी केलेली होती. महामार्ग बसस्थानकातून राज्यातील विविध भागात दिवसभरात अंदाजे ३०० बस सोडल्या जातात. स्थानक बंद होण्याआधी साधारणत १०० ते १५० बस सोडल्या गेल्या. दुपारनंतर सुमारे २०० बस शहरातील अन्य दोन स्थानकातून सोडण्याचे नियोजन करण्यात आल्याचा अंदाज महामार्ग बसस्थानकातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. स्थानक बंद करताना दुपारी राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना अन्य स्थानकात नेण्यासाठी सवलतीच्या दरात बस उपलब्ध केली होती. परंतु, नंतर स्थानकात खासगी वाहनांची गर्दी झाल्यामुळे ही बस बंद करावी लागली.